डीएचएफलच्या अडचणींमध्ये भर, कपिल वाधवानला अटक

२०० कोटीपेक्षा अधिक किंमतीला ही मालमत्ता विकली असून यातून आलेला पैसा टेरर फंड म्हणून वापरण्यात आला असल्याची दाट शक्यता तपास यंत्रणांनी वर्तविली आहे.

डीएचएफलच्या अडचणींमध्ये भर, कपिल वाधवानला अटक
SHARES

गँगस्टर इक्बाल मिर्ची आणि इतरांविरुद्ध असलेल्या मनी लाँड्रींग प्रकरणातील संबंधांच्या कारणावरून दिवाण हाऊसिंग फायनान्सचे (डीएचएफएल) अध्यक्ष आणि प्रबंध संचालक कपिल वाधवान यांना अमंलबजावणी संचलनालया (ईडी) ने आज सोमवारी अटक केली. चौकशीला सहकार्य करत नसल्यामुळे वाधवान यांना अटक करण्यात आल्याचे ईडी अधिका-यांनी सांगितले.

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपींपैकी इक्बाल मोहम्मद मेमन ऊर्फ इक्बाल मिर्ची हा एक आरोपी आहे. १९९४ साली त्याला सरकारने तडीपार केले होते. दाऊद गँगचा अंमली पदार्थांचा व्यवसाय तो सांभाळत असे. त्याला पकडण्यासाठी इंटरपोलने देखील नोटीस जारी केली होती. १९९५ साली तो भारतातून विदेशात पळून गेला. १९८८ पासून अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी तो मुंबई पोलिसांना हवा आहे. भायखळा येथे मिर्ची कुटुंबियांचा मिरची विकण्याचा व्यवसाय होता. त्यामुळेच त्याला गुन्हेगारी जगतात मिर्ची हे टोपणनाव मिळाले. 

अंमली पदार्थांच्या प्रामुख्याने मॅण्ड्रेक्स गोळ्यांच्या तस्करीत तो कुप्रसिद्ध आहे. भारतातून परागंदा झाल्यानंतर मिर्ची दुबईत आपलं साम्राज्य निर्माण केले. दुबई, लंडन येथे बोगस नावाने वावरणाऱ्या मिर्चीच्या मालकीची दुबईत तीन-चार आलिशान हॉटेल्स असल्याचं सांगितलं जातं. याशिवाय लंडनमध्ये इडन राईस मिल ही त्याचीच असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मुंबईतही मिर्चीची बरीचशी मालमत्ता आहे. ही मालमत्ता कोर्टाने ताब्यात घेतली आहे. वरळी येथे तीन, माहिम येथे दोन आणि जुहू येथे एक असे फ्लॅटस मिर्चीच्या मालकीचे असल्याचं सांगितलं जातं. वरळीतील एकेकाळी कॅब्रे नृत्यासाठी प्रसिद्ध असलेला फिशरमॅन्स क्लोव्ह हा बारही मिर्चीच्याच मालकीचा होता. याच मालमत्तांवर ईडीने टाच आणली.

मृत गँगस्टर इकबाल मिर्ची याची मालमत्ता विकत घेतल्याप्रकरणी ईडीकडून राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची शुक्रवारी १२ तास चौकशी करण्यात आली. वरळीतील सीजे हाऊसमधील त्यांच्या मालकीच्या दोन फ्लॅटच्या खरेदी व्यवहाराबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असल्याची शक्यता आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा खास हस्तक असलेल्या मिर्चीच्या मालकीच्या सीजे हाऊसमधील दोन फ्लॅट पटेल यांनी विकत घेतले असल्याचा अधिकाऱ्यांचा संशय आहे. याप्रकरणात अटक केलेल्या रणजित सिंग बिंद्रा व हारुण युसूफ या दलालाच्या चौकशीतून यासंबंधी माहिती पुढे आली आहे. २००७ मध्ये फ्लॅटचा करार होऊन हस्तांतर करण्यात आले. पटेल यांचे त्या व्यवहारावर सहमालक म्हणून स्वाक्षरी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली जाणार आहे.

दाऊद इब्राहिमचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या इकबाल मिर्चीचं फरार असताना २०१३ मध्ये लंडनमध्ये निधन झालं. त्याने १९८६ मध्ये मोहम्मद युसुफ ट्रस्टच्या वरळी येथील तीन मालमत्ता साडेसहा लाखांना विकत घेतल्या होत्या. त्याच्या मृत्यूनंतर ही मालमत्ता सुमारे २०० कोटींना विकण्यात आली आहे. या व्यवहारामध्ये कपिल वाधवान आणि त्यांचे बंधुशी संबधित कंपनी 'सन्बिक रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीच्यावतीने रणजित सिंग बिंद्रा व हारुण युसूफ याने दलाली केली होती. जवळपास २०० कोटीपेक्षा अधिक किंमतीला ही मालमत्ता विकली असून यातून आलेला पैसा टेरर फंड म्हणून वापरण्यात आला असल्याची दाट शक्यता तपास यंत्रणांनी वर्तविली आहे. याबाबत ईडीने कपिल वाधवान यांच्याकडे चौकशी केली. माञ वाधवान यांच्याकडून चौकशीस असहकार्य केल्यामुळे ईडीने अखेर त्यांना अटक केली आहे. या प्रकरणी ईडी अधिक तपास करत आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा