स्पीडब्रेकर चुकवला, म्हणून तरूणीचा जीवच गेला!


स्पीडब्रेकर चुकवला, म्हणून तरूणीचा जीवच गेला!
SHARES

रस्त्यावर असणारे खड्डे चुकवून गाडी चालवण्याची कसरत आपल्यापैकी प्रत्येकालाच करावी लागते. विशेषत: बाईक चालवणाऱ्यांना तर हमखास. पण काही जण स्पीडब्रेकर चुकवून गाडी चालवण्याचा नेहमी प्रयत्न करताना दिसतात. असाच एक प्रयत्न गोवंडीमध्ये एका तरूणीच्या जीवावर बेतला असून तिच्या मित्राने स्पीडब्रेकर चुकवण्याच्या नादात झालेल्या अपघातामुळे या तरूणीचा हकनाक बळी गेला आहे.



तरूणीचा दुर्दैवी बळी

'मिड डे'ने दिलेल्या वृत्तानुसार, हाशिम चौधरी, नावेद खान आणि रफिया खान हे तिघे अंधेरीहून साकीनाक्याच्या दिशेने मित्र बाईकवर ट्रिप्सी जात होते. हाशिम बाईक चालवत होता. तर रफिया सर्वात मागे दोन्ही पाय एकाच बाजूला करून बसली होती. हाशिमला चकाल्याजवळ समोर एक स्पीडब्रेकर दिसला. वास्तविक समोर स्पीडब्रेकर दिसल्यावर हाशिमनं बाईकचा स्पीड कमी करणं अपेक्षित होतं. पण त्यानं तसं केलं नाही, आणि तिथेच रफियाच्या जिवाशी त्यानं खेळ केला.


...तर वाचली असती रफिया

समोरच्या स्पीडब्रेकरला एका ठिकाणी मोकळी जागा होती. त्यामुळे स्पीड कमी करायचा सोडून स्पीडब्रेकर चुकवण्यासाठी हाशिमनं त्याच वेगात बाईक वळवून त्या मोकळ्या जागेतून जायचा प्रयत्न केला. पण त्याचा हा प्रयत्न फसला. हाशिमने स्पीड कमी केला असता तर कदाचित रफियाचे प्राण वाचू शकले असते.



धक्क्यासरशी हवेत उडाली रफिया

स्पीडब्रेकर चुकवण्याच्या प्रयत्नात बाईक घसरली आणि तिसऱ्या सीटवर बसलेली रफिया मागच्या मागे उडून खाली पडली. दुर्दैवानं नेमच्या त्याच वेळी मागून एक मिनिबस आली आणि रफिया बसखाली गेली.


जिवाची पर्वा असेल, तर हे करू नका!

  • शहरात बाईक चालवताना वेगमर्यादा कमीच ठेवा
  • स्पीडब्रेकर आल्यास बाईकचा वेग कमी करा
  • स्पीडब्रेकर चुकवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका, ते तुमच्याच सुरक्षेसाठी आहेत
  • बाईक दोघांना बसण्यासाठीच आहे, ट्रिप्सी बसण्याचा प्रयत्नही करू नका
  • रस्ते आहेत, स्टंटग्राऊंड नाही! बाईक बाईकसारखी चालवा, विमानासारखी नाही!


रफियासाठी मृत्यू, पण मूळ गुन्हेगाराला किरकोळ जखम

दुर्दैवानं या अपघातामुळे रफिया गंभीर जखमी झाली. हाशिम आणि नावेदनेच तिला ऑटोरिक्षामधून नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण तिथे तिचा मृत्यू झाला. पण त्याहून क्रूर बाब अशी, की रफियाचा जीव ज्यांच्यामुळे गेला, त्या हाशिम आणि नावेदला फक्त किरकोळ जखम झाली.


हाशिमला अटक, नावेद फरार

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी हाशिम चौधरीला गोवंडीमधून अटक करण्यात आली असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. तर नावेद अद्याप फरार असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल. शिवाय, मिनी बसचालकाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



हेही वाचा

सरदारजींनी केले ट्रॅफिक पोलिसाला नामोहरम! व्हिडिओ व्हायरल!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा