SHARE

कित्येक वर्षांपासून फिल्मसिटी, संतोष नगर, दिंडोशी परिसरात अंमली पदार्थ विकणाऱ्या एका सराईत टोळीचा दिंडोशी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे या टोळीने चाळीत राहणाऱ्या तरुणांसह नवोदित कलाकारांनाही ड्रग्सची सवय लावल्याचं समोर आलं आहे.

गेल्या 7 ते 8 वर्षांपासून दिडोंशी परिसरात परमार कुटुंबाने ड्रग्सचा व्यापार करून हाहाकार माजवला होता. फिल्मसिटीतील नवोदित कलाकारांसह इतरांना या कुटुंबाने गांजा, चरस, एमडी ड्रग्स, बटन, कोरेक्स सीरप सारख्या अंमली पदार्थांच्या स्वाधीन केले होते. सुरूवातील ग्राहक मिळवण्यासाठी हे टोळकं मोफत ड्रग्ज वाटत असे आणि ती व्यक्ती ड्रग्जच्या आहारी जाताच त्यांच्याकडून इतर लोकांना ड्रग्ज विकले जात असे.

पोलिसांना या टोळीची माहिती होती, पण जेव्हा जेव्हा पोलीस त्यांना पकडण्यासाठी जात, तेव्हा या टोळीतील महिला पुढे येऊन स्वतःचे कपडे फाडून घेत असे आणि पोलिसांवर खोटे आरोप करत असे. त्यामुळे पोलीस देखील यांच्या वाटेला जात नसत.

काही दिवसांपूर्वीच दिंडोशी पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलिस निरिक्षकांची बदली झाली आणि नवीन आलेल्या राजाराम व्हनमाने यांनी मात्र या टोळीचा बंदोबस्त करण्याच ठरवलं आणि महिला पोलीस घेऊन त्यांच्या अड्ड्यावर छापा मारला. यावेळी दिंडोशी पोलिसांच्या पथकाने रमेश उर्फ विजय शाम परमार (27), गीता शाम परमार (47), शालू रमेश परमार (19) आणि मारता परमार (21) यांना अटक केली. या चौघांकडून पोलिसांनी गांजा, चरस, एमडी ड्रग्ज, बटन असे दीड लाख किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले.

अद्याप या आरोपींचा भाऊ अजय शाम परमार उर्फ राजू फरार असून त्याचा शोध सुरु आहे. ही टोळी गेल्या कित्येक वर्षांपासून संतोष नगर फिल्मसिटी परिसरात ड्रग्ज विकत असून ही टोळी गजाआड झाल्याने ड्रग्जच्या धंद्याला आळा बसेल, असा विश्वास दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजाराम व्हनमाने यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या