कफ सिरपमधून होणाऱ्या नशेच्या बाजाराचा पर्दाफाश


कफ सिरपमधून होणाऱ्या नशेच्या बाजाराचा पर्दाफाश
SHARES

नशा, गुंगी आणण्यासाठी कोडीन फॉस्फेट हे रासायनिक घटक असलेल्या औषधांच्या तस्करीचा आणि बेकायदा विक्रीचा गोरख धंदा तेजीत सुरू असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने नुकतेच कोडीन फॉस्फेट असलेल्या कोरेक्स कफ सिरपचे 18 बॉक्स अर्थात 999 बॉटल्स जप्त केल्या असून झोपेच्या नायट्रावेट टॅबलेट्सही जप्त केल्या आहेत. उत्तर प्रदेशातून हा साठा मुंबईत आणून नशेसाठी तिप्पट किंमतीत ही औषधे विकण्यात येणार होती. या कारवाईतूनही नशेच्या बाजाराचा हा पर्दाफाश झाला आहे. शेड्यूल एचमध्ये मोडणारी ही औषधे मुंबईत येतातच कशी? औषध तस्कारांपर्यंत ही औषधे पोहचतात कशी? असे अनेक प्रश्न करत जनआरोग्य चळवळीतील कार्यकर्त्यांनी याप्रकरणी आता अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) सह पोलिसांकडेही बोट दाखवले आहे.

नशेच्या औषधांच्या तस्करीची आणि बेकायदा विक्रीची अनेक प्रकरणे उघड होतात. त्याप्रकरणी तपास होतो, पण प्रकरणाच्या मुळाशी या दोन्ही यंत्रणा जात नसल्याने एकाही प्रकरणाचा छडा लागून आरोपीला शिक्षा झाल्याचे चित्र नाही. या दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने नशेच्या औषधांचा बाजार तेजीत असून त्यामुळे तरुण पिढीचे नुकसान होत आहे. 

- उमेश खके, कार्यकर्ते, जनआरोग्य चळवळ 

आता तरी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देत या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे.


रविवारी गुन्हे शाखेने 1 लाख 20 हजार किंमतीच्या कोरेक्स कफ सिरपच्या बाटल्या जप्त करत दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. कोरेक्स अर्थात कोडीन फॉस्फेट घटक असलेले कोणतेही औषध प्रिस्क्रिप्शनशिवाय विकता येत नाही. मात्र कोडीन फॉस्फेट औषधांची बेकायदा विक्री मुंबईत नशेसाठी सुरू असल्याच्या घटना वारंवार समोर येत नाहीत. असे असताना यावर लक्ष ठेवण्याची मुख्य जबाबदारी असलेली एफडीए मात्र याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. याप्रकरणी एफडीएने त्वरीत गुन्हे शाखेशी संपर्क साधत नमुने घेत चौकशी करणे अपेक्षित होते. पण अद्याप एफडीएने हे पाऊल उचलले नसल्याने एफडीए उदासीन असल्याचेच यातून स्पष्ट होते.

- आर. पी. वाय राव, माहिती अधिकार कार्यकर्ते

एफडीएचे सहआयुक्त (औषध) विनिता थॉमस यांनी मात्र या प्रकरणाची माहिती मिळत नसून अधिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे 'मुंबई लाइव्ह'ला सांगितले. गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या कारवाईची माहिती एफडीएला मिळत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त करत राव यांनी एफडीए आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप केला आहे. एफडीए आणि पोलिसांमधील याच समन्वयाच्या अभावामुळे नशेचा बाजार तेजीत असल्याचे म्हणत खके यांनी समन्वय साधत तरुण पिढीला नशेच्या व्यसनातून बाहेर काढण्याची गरज व्यक्त केली आहे.

व्हाइटनर आणि वेदनाशामक मलमांवरही निर्बंध हवेत

खोकल्याच्या, झोपेच्या औषधांसह नशेसाठी सध्या शाई पुसण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या व्हायटनर आणि वेदना शामक मलमांचा वापरही मोठ्या प्रमाणात होत आहे. व्हाइटनर चाखत नशा केली जाते, तर वेदनाशामक मलम ब्रेड वा चपातीला लावून खाल्ले जाते. नशेसाठी सहज उपलब्ध होणाऱ्या या गोष्टी असल्याने याकडे आता सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. त्यानुसार व्हाइटनर आणि वेदना शामक मलमांच्या खरेदी-विक्रीवरही निर्बंध आणण्याची मागणी जनआरोग्य चळवळीतील तज्ज्ञांकडून केली जात आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय