SHARE

ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकानं बांधकाम व्यावसायिकाकडून ५ लाखांची खंडणी घेताना एका साप्ताहिकाच्या संपादकाला अटक केली आहे. सिद्धार्थ मोकळ (२७) असं या संपादकाचं नाव असून त्याच्यासोबत त्याच्या साथीदारालादेखील ठाणे खंडणी विरोधी पथकानं अटक केली आहे.


बांधकाम तोडण्याची धमकी

डी. के. होम बिल्डर्सचे प्रवर्तक दिलीप कटके यांचा कोनगाव इथं साईप्लस अपार्टमेंट नावाचा एक हाऊसिंग प्रोजेक्ट सुरू आहे. या प्रोजेक्टचं काम सुरू असताना मे महिन्यात एका महिलेनं संपूर्ण प्रोजेक्टचं चित्रीकरण केलं. त्यानंतर हे चित्रीकरण यू ट्यूबवर प्रसारित करण्यात आलं. त्याचबरोबर १२ ते १८ ऑगस्टदरम्यान "राजकीय दर्शन" नावाच्या साप्ताहिकात डी. के. होम बिल्डर्सनं रॉयल्टी बुडवून शासनाची फसवणूक केल्याची बातमी छापण्यात आल्याचं कटके यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

याबाबत साप्ताहिकाचे संपादक सिद्धार्थ मोकळ यांना विचारणा केली असता तुम्ही बांधकामाच्या सर्व परवानग्या घेतल्या नसून तुमच्या विरुद्ध तक्रारी मागे घेण्याकरीता आणि बातम्या न छापण्याच्या बदल्यात ४ फ्लॅट्सची मागणी केल्याचा दावाही कटके यांनी केला. यावेळी मोकळनं फ्लॅट न दिल्यास बांधकाम पाडून टाकेन आणि तुम्हाला संपवून टाकण्याची धमकी दिल्याचं दीपक यांनी सांगितलं.


खंडणीचा व्हिडिओ रेकॉर्ड 

तडजोडी अंती कटके यांनी खंडणीची रक्क्म २० लाख रुपयांवर आणली आणि पहिला हप्ता म्हणून मोकळला पाच लाख रुपये देण्याचं ठरलं. खंडणी देण्याची इच्छा नसलेल्या दिलीप कटके यांनी मोकळसोबत केलेल्या वाटाघाटीचा व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग करत ठाणे पोलिसांकडं धाव घेतली.

त्यानंतर ठाणे खंडणी विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावला आणि गुरुवारी संध्याकाळी ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहाजवळ दिलीप कटके यांच्याकडून ५ लाखांची खंडणी घेताना सिद्धार्थ मोकळ आणि त्याचा साथीदार सतीशचंद्र सरोज (३९) या दोघांना रंगेहाथ अटक केली. सध्या हे दोघेही ठाणे खंडणीविरोधी पथकाच्या ताब्यात असून पोलीस सध्या त्यांची चौकशी करत आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या