तळीरामांचे होणार हाल, ३ कोटी ८२ लाखांची बेकायदा दारू जप्त

धडक कारवाई करत विभागाने आतापर्यंत एकूण ३ कोटी ८२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामुळे बेकायदा मद्य वाहतूक आणि मद्य विक्री करणाऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

तळीरामांचे होणार हाल, ३ कोटी ८२ लाखांची बेकायदा दारू जप्त
SHARES

राज्यात ठिकठिकाणी बेकायदेशीरपणे मद्यविक्री (Illegal liquor distribution) सुरू असल्याच्या बातम्या येत असताना राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने (Excise Department) या बेकायदा मद्य विक्रीला चाप लावण्यासाठी कंबर कसली आहे. त्यानुसार धडक कारवाई करत विभागाने आतापर्यंत एकूण ३ कोटी ८२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामुळे बेकायदा मद्य वाहतूक आणि मद्य विक्री करणाऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

हेही वाचा - लोकं १४ एप्रिलनंतर घरात राहण्याच्या मन:स्थितीत नाही- हसन मुश्रीफ

तळीरामांचे हाल

संपूर्ण देशभरात १४ एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन (lockdown) असल्याने जीवनावश्यक सेवा वगळत इतर सर्व उद्योगधंदे, दुकाने सक्तीने बंद ठेवण्यात आली आहेत. यामध्ये मद्य उत्पादन करणारे कारखाने आणि मद्यविक्री करणाऱ्या दुकानांचाही समावेश आहे. शिवाय राज्याच्या सीमा देखील सील असल्याने बाहेरच्या राज्यातून होणारी मद्य वाहतूक देखील पूर्णपणे ठप्प आहे. यामुळे तळीरामांचे चांगलेच हात होत आहेत. अशा स्थितीत तळीरामांची गरज भागवण्यासाठी तसंच काळ्याबाजारात चढ्या दराने मद्यविक्री ( illegal liquor sale) करण्यासाठी बेकायदा मद्यविक्रीचा प्रकार वाढू लागला आहे. त्यामुळे कुठे अन्नधान्यांच्या गाडीतून, तर कुठे सिलिंडर गॅसच्या बाटल्यातून अवैधपणे मद्यविक्री होत असल्याच्या तक्रार सातत्याने उत्पादन शुल्क विभागाकडे येत होत्या. 

गस्त वाढवली

या बेकायदा मद्यविक्रीला चाप लावण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने आपल्या गस्ती पथकांत वाढ करत त्यांना कामाला लावलं. त्यानुसार बेकायदा मद्य विक्री व वाहतूक रोखण्यासाठी केलेल्या धडक कारवाईत एका दिवासात १५२ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून ५५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान ३८ लाखांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंत केलेल्या कारवाई अंतर्गत एकूण १५७१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. ५९६ आरोपींना अटक, तर ३ कोटी ८२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील (excise minister dilip walse patil) यांनी दिली. 

हेही वाचा - राज्याने केंद्राकडे मागितले ९ लाख N ९० मास्क

‘इथं’ करा तक्रार

बेकायदा मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री याविरुद्ध तक्रार करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष २४×७ सुरू आहे. तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक १८००८३३३३३३, व्हाट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ आणि ई-मेल commstateexcise@gmail.com संपर्क साधता येईल. तक्रारदाराचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असं आवाहन उत्पादन शुल्क विभागाद्वारे करण्यात आलं आहे.  

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा