जळगावच्या शेतकऱ्याची वसईत आत्महत्या, घटना सीसीटीव्हीत कैद


SHARES

वसई रोड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर चर्चगेटहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकलखाली उडी घेऊन एका तरुणाने रविवारी सायंकाळी आत्महत्या केली. या तरूणाचे नाव संदीप पंजू पाटील (32) असे असून संदीप जळगाव येथील शेतकरी असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. वसई रोड रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार 11 जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास संदीप वसई रोड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर उभे होते. विरारच्या दिशेने जाणारी ट्रेन आल्यावर संदीप यांनी दोन डब्यांच्या मधोमध उडी मारली. अचानक झालेल्या या घटनेने प्लॅटफॉर्मवरील इतर प्रवासी स्तब्ध झाले. ही दुर्दैवी घटना प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. प्रवाशांनी या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी संदीप यांना बाहेर काढले. परंतु त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

त्यांचे कपडे तपासल्यावर त्यात आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर ओळखपत्रे सापडली. त्यांच्याकडे सापडलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर ते जळगावचे राहणारे असल्याचे समोर आले.

याप्रकरणी वसई रेल्वे पोलिस अधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितले की, संदीप याला दोन भाऊ असून यापैकी एकजण नौदलात काम करतो, तर दुसरा बोईसरमध्ये राहतो. तर संदीप जळगावमध्ये शेती करत होते. हे तिन्ही भाऊ अविवाहित आहेत. संदीप 10 जून रोजी घरातून बियाणे आणि खत आणण्यासाठी 5 हजार रुपये घेऊन निघाले होते. संदीपचे शव त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून त्यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, याची चौकशी सुरु आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा