सावत्र मुलीवर अत्याचार करणारा नराधम बाप गजाआड

 wadala
सावत्र मुलीवर अत्याचार करणारा नराधम बाप गजाआड
wadala, Mumbai  -  

वडाळा टीटी पोलिसांना चार वर्षांपासून गुंगारा देणारा फरार नराधम अखेर सोमवारी सायंकाळी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. सय्यद अली मोहम्मदअली सिद्धीकी (50) असे त्याचे नाव असून, त्याने स्वतःच्या सावत्र अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. 

वडाळा टीटी पोलीस 2013 सालापासून या नराधमाच्या मागावर होते. मात्र तो वारंवार ठिकाणं बदलत असल्यानं तो पोलिसांना सापडत नव्हता. अखेर सोमवारी संध्याकाळी वडाळ्यातील शांतीनगर जंक्शन परिसरात हा नराधम मोकाट फिरत असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली. त्यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार दिलीप मोकल, पोलीस नाईक ज्ञानेश्वर मिंडे, सुभाष चव्हाण, सूर्यकांत पोळ, शरद चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच त्याने पळ काढला. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. चौकशी दरम्यान त्याच्याजवळ मानवी हक्क आयोगाचे ओळखपत्र सापडल्याने पोलीस चक्रावून गेले आहेत. त्याच्यावर कलम 354, 323, 504, भां. द. वि. अन्वये मंगळवारी कारवाई करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे. सन 2013 साली घरात कुणी नसल्याचे पाहून या नराधमाने आपल्या सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार करून पळ काढला होता. या घटनेबाबत पीडित मुलीच्या आईला समजताच तिने वडाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

Loading Comments