पानमसाला-गुटखा बंदीची ऐशी-तैशी करणाऱ्यांचीच होणार ऐशी तैशी


पानमसाला-गुटखा बंदीची ऐशी-तैशी करणाऱ्यांचीच होणार ऐशी तैशी
SHARES

राज्यात गुटखा, पानमसाला आणि सुगंधित सुपारीच्या विक्रीसह उत्पादनावर बंदी लागू होऊन 5 वर्षे उलटली तरी मुंबईसह राज्यात छुप्या पद्धतीने, कायदा धाब्यावर ठेवत गुटखा-पानमसाला आणि सुगंधित सुपारीची विक्री होत आहे. गुटखा बंदीचा निर्णय ज्या मंत्रालयातून घेण्यात आला, त्या मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावरही गुटखा-पानमसाल्याचा गोरखधंदा कसा चालतो याचा पर्दाफाश मुंबई लाइव्हने केला आहे. स्टिंग ऑपरेशनमध्ये कैद झालेल्या या गोरखधंद्यासंबंधीचे वृत्त मुंबई लाइव्हने प्रसिद्ध केल्याबरोबर अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) खडबडून जागे झाले आहे. त्यानुसार मंत्रालय परिसरात लवकरच विशेष मोहीम राबवत आसपासच्या पान टपऱ्यांची झाडाझडती घेण्यात येईल आणि दोषींविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती एफडीए चे सहआयुक्त (अन्न) सुरेश अन्नपुरे यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे.

गुटखा-पान मसाला आरोग्यास घातक असल्याचे म्हणत एफडीएने गुटखा, पान मसाला आणि सुगंधित सुपारीच्या विक्रीसह उत्पादनावरही बंदी घातली. त्यामुळे पान टपऱ्यांवर गुटखा, पान मसाला, सुंगधित सुपारीची विक्री बंद झाली. पण छुप्या पद्धतीने ही विक्री आजही सुरू आहे. एफडीएने गेल्या चार वर्षात कोट्यवधींचा गुटखा-पानमसाला जप्त करत नष्ट केला आहे. अनेकांवर खटलेही दाखल केले आहेत. पण तरीही गुटख्याची बेकायदा, छुपी विक्री 100 टक्के बंद करण्यात एफडीएला यश येत नाही आणि हेच मुंबई लाइव्हच्या स्टिंग ऑपरेशनमधून सिद्ध झाले आहे. 

"विशेष पथक (फ्लाईंग स्काँड) पाठवून कारवाई करण्यात येईल आणि संबधित पान विक्रेत्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश संबधित अधिका-यांना देण्यात येतील" - गिरीष बापट, अन्न आणि औषध पुरवठा मंत्री 

याबाबत मुंबईकरांनी मुंबई लाइव्हला दिलेल्या काही प्रतिक्रिया

मुंबई लाइव्हच्या वृत्ताची एफडीएने गंभीर दखल घेतली आहे. एफडीएच्या 8 ते 10 अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक लवकरच मंत्रालय परिसरात विशेष मोहीम राबवणार आहे. या मोहिमेत गुटखा जप्त करण्यासह गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधात तात्काळ गुन्हे दाखल करून खटलेही भरले जाणार असल्याचे अन्नपुरे यांनी सांगितले आहे. दरम्यान गुटखा विक्रीच नव्हे तर उत्पादनावरही बंदी असताना गुटखा येतो कुठून आणि कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत अन्नपुरे म्हणाले की, कर्नाटक आणि गुजरात राज्यातून रस्ते आणि रेल्वे मार्गाने छुप्या पद्धतीने गुटखा-पान मसाला राज्यात येतो. अशा पद्धतीने येणाऱ्या गुटखा-पानमसाल्यावर आमची करडी नजर असते. पण रेल्वेच्या हद्दीत कारवाई करता येत नाही, ही मोठी अडचण ठरते. मनुष्यबळाअभावी सर्वच जकात नाक्यांवर नजर ठेवणे शक्य होत नसल्याचेही त्यांनी मान्य केले. असे असले तरी एफडीएला जशी माहिती मिळते तशी एफडीएकडून त्वरीत कारवाई केली जाते. त्यामुळेच आतापर्यंत कोट्यवधींचा गुटखा जप्त केल्याचेही ते म्हणाले.

हे पण वाचा - पान मसाला, गुटखा बंदीची ऐशी-तैशी, मुंबई लाइव्हने केला पर्दाफाश

महत्त्वाचे म्हणजे परराज्यातून गुटखा येऊ नये यासाठी गुजरातसह कर्नाटक राज्याने कारवाई करावी, आवश्यक ते प्रयत्न करावेत यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला आहे. पण अजूनही या राज्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने गुटखा तस्करांचे फावत असल्याचेही एफडीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे. एफडीए अडचणींचा पाढा वाचत असले तरी गुटखा-पानमसाला बंदी 100 टक्के यशस्वी करण्याची जबाबदारी एफडीएचीच आहे.  

भ्रष्ट अधिकाऱ्यामुळे गुटखा-पानमसाल्याचा गोरख धंदा

एफडीए आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत नसल्याचा खळबळजनक आरोप यानिमित्ताने माहिती अधिकार कार्यकर्ते आर. पी. वाय. राव यांनी केला आहे. मुनष्यबळ कमी आहे हे कारणच होऊ शकत नाही. कायद्याचे योग्य प्रकारे पालन केले, तर गुटखाबंदी 100 टक्के यशस्वी होऊ शकते, असे म्हणतानाच एफडीए आपली जबाबदारी टाळत असल्याचा आरोपही राव यांनी केला. महत्त्वाचे म्हणजे जप्त केलेला गुटखा कित्येक वेळा एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून सोडून दिला जात असल्याचाही खळबळजनक आरोपही त्यांनी केला. त्यामुळे एफडीएच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवरच आधी कारवाई होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे मुंबई लाइव्हच्या स्टिंग ऑपरेशनचे राव यांनी विशेष कौतुकही केले आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा