वांद्र्याच्या गरीबनगरमध्ये गुरुवारी भीषण आग लागली होती. महापालिकेची अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई सुरू असतानाच आग लागल्याने ही आग लागली की लावली गेली अशी शक्यता वर्तवली जात होती. आता ही शक्यता खरी ठरली आहे. कारण पोलिसांच्या तपासात कारवाई थांबवण्यसाठी आग लावल्याचे निष्पन्न झाले असून आरोपी शब्बीर खानला निर्मल नगर पोलिसांनी अटक केली आहे.
गुरुवारी पालिकेने तेथील अनधिकृत झोपड्या हटवण्यासाठी धडक कारवाई हाती घेतली होती. याच कारवाईदरम्यान तेथील झोपड्यांना भीषण आग लागली होती. ही आग अपघात नसून ती जाणून-बुजून लावण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. यामध्ये कित्येक झोपड्या या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या होत्या.
या प्रकरणी निर्मलनगर पोलिसांनी शब्बीर खानला अटक केली आहे. यामधील 10 ते 15 जण अजूनही फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. फरार आरोपींमधील काही आरोपी हे 11 ऑगस्ट 2012 साली आझाद मैदानात झालेल्या दंगलीचे आरोपी असल्याचे समजते. पोलिसांनी दावा केला आहे की, ही आग दुर्घटना नसून आग लावण्यात आली आहे. आरोपींनी संगनमत करून झोपड्यांवर रॉकेल टाकून झोपड्या पेटवून दिल्या. आग आणखी भडकावी म्हणून त्यात गॅस सिलेंडरदेखील टाकण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी आम्ही शब्बीर खानला अटक केली असल्याची माहिती निर्मलनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांनी दिली आहे.
11 ऑगस्ट 2012 साली मुंबईच्या आझाद मैदानात भीषण दंगल उसळली होती. त्यावेळी अनेक महिलांचा विनयभंग झाल्याचे समोर आले होते. ज्यात महिला पोलिसांना देखील लक्ष्य करण्यात आले होते. या दंगलीत आझाद मैदान परिसरातील अमर जवानच्या वास्तूची नासधूस करण्यापर्यंत नराधमांची मजल गेली होती. या दंगलीत झालेल्या नुकसानाची भरपाई करून घेण्यात अजूनही सरकारला यश आलेले नाही.
हेही वाचा -
७ वर्षांत तिसऱ्यांदा आग, गरीब नगरचं जुनंच अस्त्र?