गँगस्टर एजाज लकडावालाच्या साथीदाराला अटक

व्यापार्‍याकडून एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी नदीम याला अटक करण्यात आली

गँगस्टर एजाज लकडावालाच्या साथीदाराला अटक
SHARES

मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने गँगस्टर एजाज लकडावाला याच्या जवळच्या साथीदाराला अटक केली आहे. नदीम लकडावाला असे आरोपीचे नाव आहे. एका व्यापार्‍याकडून एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी नदीम याला अटक करण्यात आली आहे. एजाज लकडावाला सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्या चौकशीदरम्यान नदीम याचे नाव समोर आले होते. नंतर मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, खारमध्ये राहणारा नदीम परदेशातून मुंबईत येताच त्यास विमानतळावर अटक करण्यात आली  शनिवारी मुंबई एअरपोर्टवर पोलिसांनी  त्याला अटक  केली. रविवार त्याला कोर्टात हजर केले असता त्याला तीन मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी गेल्या आठवड्यात मोस्ट वाँटेड गँगस्टर एजाज लकडावाला याच्या मुसक्या आवळल्या होत्या. बिहारचा राजधानी पाटणा येथे एजाजला अटक करण्यात आली होती. नंतर त्याला मुंबईत आणण्यात आले होते. एजाज लकडावाला याच्याविरुद्ध मुंबईसह दिल्लीत जवळपास २५ गुन्हे दाखल आहेत.

बेकायदा वसुली, हत्या आणि खंडणीच्या खटल्यांचा समावेश आहे. गँगस्टर एजाज लकडावाला याच्या अटकेवर ज्वाइंट कमिशनर संतोष रस्तोगी यांनी सांगितले होते की, त्याची मुलगी पोलिसांच्या ताब्यात होती. तिने चौकशीत सांगितले होते की, एजाज लकडावाला पाटणा येथे येणार आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार सापळा रचून बिहारमधील जट्टनपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत एजाज याला अटक करण्यात आली. गँगस्टर एजाज लकडावाला याला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा निकटवर्तीय मानले जाते.

 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा