दुचाकीचोराला अखेर पोलिसांनी पकडले

 Govandi
दुचाकीचोराला अखेर पोलिसांनी पकडले
Govandi, Mumbai  -  

दिवसेंदिवस दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलिसांची झोप उडाली आहे. मात्र घाटकोपर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी याविरोधात कंबर कसून परिसरात दुचाकींची चाेरी करणाऱ्या आरोपीचा छडा लावला आहे. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकांनी सापळा रचून मोहम्मद जावेद जान शेख (24) या दुचाकीचोराला शुक्रवारी गोवंडीमधील शिवाजीनगर येथून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून दुचाकी चोरीचे 10 गुन्हे उघडकीस आले आहेत.

मोहम्मद जावेद जान शेख याने दिलेल्या माहितीनुसार घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2 मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या. त्यानंतर टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 3 मोटारसायकल, देवनार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2, नेहरूनगर पोलीस ठाणे हद्दीतून 1, धारावी पोलीस ठाणे हद्दीतून 1 आणि दिंडोशी पोलीस ठाणे हद्दीतून 1 मोटार सायकल चोरी केली असल्याचे त्याने सांगितले. त्याच्या या कामात त्याला साथीदार हैदर ईद्रीस खान (42) मदत करत असे. त्यालाही पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक हेमंत फड आणि गुन्हे प्रकटीकरण पथक करत आहे.

Loading Comments