सिनेमास्टाईल अपहरण! गुंडांनी पोलिसांच्या वेशात व्यापाऱ्याला पळवलं


सिनेमास्टाईल अपहरण! गुंडांनी पोलिसांच्या वेशात व्यापाऱ्याला पळवलं
SHARES

पोलिसांचा वेश घालून काही जण धावतपळत येतात अाणि रस्त्यावर उभ्या असलेल्या एका व्यक्तीला किंवा अभिनेत्रीला गाडीत घालून पळवून नेतात. अनेक सिनेमांत हमखास दिसणारा हा सीन, विलेपार्लेकरांनी प्रत्यक्ष अनुभवला. मिलन सबवे इथं शुक्रवारी संध्याकाळी पोलिसांच्या वेशात येऊन गुंडांनी एका व्यापाऱ्याचं अपहरण केलं. या घटनेची माहिती खऱ्याखुऱ्या पोलिसांना मिळताच, काही तासांच्या अातच या व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या गुंडांना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली.


कपडे व्यापाऱ्याचं केलं अपहरण

नागपाडा इथं राहणाऱ्या वसिम सिद्दीकी यांचा मुंबईत कपड्यांचा व्यवसाय अाहे. दुबईहून महागडे कपडे अाणून ते मुंबईत विकायचे. शुक्रवारी काही कामानिमित्त विलेपार्लेच्या मिलन सबवे येथील बसस्टाॅपवर बसची वाहत पाहत ते उभे होते. संध्याकाळी सात वाजताची वेळ असल्यानं रस्त्यावर बरीच वर्दळ होते. त्याचवेळी एक रिक्षा वसिम यांच्यासमोर येऊन उभी राहिली. पोलिसांच्या वेशातील तीन जण रिक्षातून धावत उतरले अाणि वसिम यांनी रिक्षात बसण्यासाठी जबरदस्ती करू लागले. वसिम यांनी जाब विचारल्यानंतर मात्र या गुंडांनी त्यांना मारहाण करत रिक्षात बसवले. हे सर्व थरारनाट्य पाहून जमा झालेल्या लोकांना मात्र हा सराईत चोर असून अनेक दिवसांपासून पोलीस शोध घेत असल्याचे वाटले.


धारावी इथं खोलीत बंद करून ठेवले

रिक्षाचालकासह तिन्ही अारोपींनी वसिमला धारावी इथल्या एका खोलीत बंद करून ठेवलं. त्याच्याजवळील मौल्यवान वस्तू, पाकिटातील सर्व पैसे अाणि ३४०० अमेरिकन डाॅलर त्यांनी काढून घेतले. अापल्यासोबत नेमका काय प्रकार सुरू अाहे, हेच वसिमला कळत नव्हतं.


मोबाईलमुळे झाली सुटका

चोरांची नजर मात्र वसिमच्या मोबाईलवर पडली नव्हती. लघुशंकेचं कारण पुढे करून बाथरूममध्ये जाऊन त्याने अापल्या मित्राला फोन लावला अाणि सर्व हकिकत सांगितली. मित्राने ही माहिती गुन्हे शाखा ९ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांना दिली. त्यानंतर देसाई यांनी अापल्या पथकाला कामाला लावत काही तासांचत अारोपींचा ठावठिकाणा शोधून काढला. पोलिसांनी व्यापाऱ्याची सुखरूप सुटका करत चारही अारोपींनी विलेपार्ले पोलिसांच्या ताब्यात दिले अाहे. मात्र अारोपींनी व्यापाऱ्याचे अपहरण का केले, याचा तपास अद्याप सुरू अाहे. व्यापाऱ्याच्या जवळच्याच व्यक्तीने धमकावण्यासाठी हा कट रचला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला अाहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा