रेल्वे ट्रॅकवर पुन्हा घातपाताचा प्रयत्न? मस्जिद बंदरहून एकाला अटक


रेल्वे ट्रॅकवर पुन्हा घातपाताचा प्रयत्न? मस्जिद बंदरहून एकाला अटक
SHARES

मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेचा मोठा अपघात टळला. छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मस्जिद बंदर दरम्यानच्या रेल्वे रुळावर शनिवारी एका तरुणाने चक्क सहा फुटाचा रेल्वे रुळाचा तुकडा ठेवलेला. सुदैवाने तिथून जाणाऱ्या पॉइंट्समनने त्या तरुणाला रोखलं आणि एक मोठी दुर्घटना टळली. या प्रकरणी जीआरपीने देवा सुखलाल कौल (19) नावाच्या तरुणाला अटक केली आहे.

शनिवारी संध्याकाळी सात ते आठच्या सुमारास छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मस्जिद बंदरदरम्यान कर्नाक बंदर पुलाच्या खालील स्लो-अप ट्रॅकवर एक सहा फुटी लोखंडी रुळाचा तुकडा असल्याचे तिथून जाणाऱ्या सुरेंद्र कुमार शर्मा (28) नावाच्या तरुणाने पॉइंट्समनच्या नजरेत आणून दिले. तिथेच शेजारी उभा राहून एक तरुण सिग्नलवर दगड फेकत होता. हे बघताच सुरेंद्र शर्मा यांनी तात्काळ या तरुणाला पकडलं आणि आरपीएफच्या ताब्यात दिलं. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने काही क्षणाचाही विलंब झाला असता तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती.

देवा कौल असं या तरुणाचं नाव असून सध्या त्याला सीएसटी जीआरपीने भारतीय रेल्वे कायद्याच्या १५० (१) (२) (क )(ड ) कलमांतर्गत अटक केली आहे. रविवारी त्याला कोर्टात हजार केलं असता कोर्टाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सीएसटी जीआरपीने दिली. हा तरुण रेल्वे रुळावर पडलेल्या रिकाम्या बाटल्या उचलण्याचे तसेच फुगे विकण्याचे काम करत असल्याचे सांगितले जात आहे. अद्याप या तरुणाने असे का केले हे स्पष्ट झाले नसून सध्या जीआरपी त्याची कसून चौकशी करत आहे.

या आधी मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान एक साडे सहा मीटर लांबीचा रुळ ट्रॅकवर ठेऊन मोठा घातपात घडवण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी पाच जणांना याआधी अटक केली होती. या घातपाताशी देवा कौलचा काही संबंध तर नाही ना? याचा सध्या पोलीस तपास करत आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा