नावाजलेल्या एन्काऊंटर स्पेशालिस्टचा मुंबईत गुटखा माफियांवर वरदहस्त?


नावाजलेल्या एन्काऊंटर स्पेशालिस्टचा मुंबईत गुटखा माफियांवर वरदहस्त?
SHARES

मुंबई पोलिसांच्या सी. बी. कंट्रोलने मंगळवारी सांताक्रुझ येथून तब्बल ७० लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी विवेक नायक (४५) आणि बिंदिया नायक(४५) या पती पत्नीच्या जोडप्याला अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही एका नावाजलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे जवळचे नातलग असल्याने आजपर्यंत दोघांवर कारवाई न झाल्याची बरीच चर्चा पोलिस खात्यात सध्या सुरु आहे.

सांताक्रुझ एस. व्ही. रोड वरील रिझवी पार्क सोसायटीच्या दुकानातून हा गुटखा जप्त करण्यात आला होता ती जागा या बिंदिया नायकने लिव्ह एन्ड लायसन्स तत्वावर घेतली होती. गेल्या काही वर्षांपासून ही जागा दोघांच्या ताब्यात असून आपल्या नावाचा उपयोग त्यांनी सोसायटीवर अंकुश ठेवण्यासाठी केल्याची माहिती समोर आलीये.



महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी असून देखील जर एवढ्या काळापासून इथे गुटख्याचा व्यापार सुरु होता, तर आजपर्यंत या दोघांवर का कारवाई झाली नाही? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. त्याचबरोबर या दोघांनी आपल्या नावाचा तसेच पोलिस खात्यातील त्याच्या नातेवाईकाचा वापर करून आजपर्यंत हे दोघे कारवाईपासून बचाव करत राहिले का? असा प्रश्न देखील आता उपस्थित झाला आहे.

'सांताक्रुझ येथे एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटखा असल्याची आम्हाला माहिती मिळाली. त्यानंतर या ठिकाणी धाड टाकून आम्ही तब्बल ७० लाखांचा गुटखा जप्त केला असून सध्या गुटख्यासह दोघा आरोपींना आम्ही अन्न आणि औषध खात्याच्या हवाली केल्याची माहिती सी. बी. कंट्रोल शाखेचे एसीपी राजेंद्र त्रिवेदी यांनी 'मुंबई लाईव्ह'शी बोलताना दिली आहे. दोन गाळ्यांसह बाहेर उभ्या असलेल्या दोन्ही टेम्पोमध्ये देखील गुटखा असल्याचं ते म्हणालेत. आत्तापर्यंतच्या चौकशीत हा गुटखा गुजरातहून वसईमार्गे मुंबईला आल्याचं समजतंय.



पोलिसांच्या या कारवाईवरून सरकारची गुटखाबंदी केवळ कागदावरच असल्याचे स्पष्टपणे दिसते. महाराष्ट्रात गुटखा आणि पान मसाल्याचे उत्पादन, विक्री, साठवणूक आणि वाहतुकीवर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. परंतु, शहरात आजही अनेक पानटपऱ्यांवर लपूनछपून गुटखा विकला जातो. या काळाबाजाराचे रॅकेट संपूर्ण मुंबईत पसरले असून मुंबई पोलिस आणि एफडीएने मात्र याकडे साफ कानाडोळा केल्याचं दिसतंय.



हेही वाचा

मंत्रालयाच्या दारातच गुटखाबंदीचा पर्दाफाश


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा