पत्नीची हत्या करून पतीचे पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण

पत्नीच्या मानसिक त्रासाला कंटाळून अंधेरीत ३१ वर्षीय तरुणानं पत्नीचा गळा आवळून हत्या केल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीस आली आहे.

SHARE

पत्नीच्या मानसिक त्रासाला कंटाळून अंधेरीत ३१ वर्षीय तरुणानं पत्नीचा गळा आवळून हत्या केल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीस आली आहे. आरती चेतन चौगुले (२२) असं मृत महिलेचं नाव आहे. दरम्यान, हत्या केल्यानंतर स्वतः चेतननं पोलिस ठाण्यात येऊन आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी न्यायालयानं चेतन याला १५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 


माहेरी निघून जाण्याची धमकी

अंधेरी एमआयडीसीच्या कामगार रुग्णालय वसाहतीत चेतन चौगुले हा पत्नी आरती, २ वर्षांचा मुलगा कृष्णा, आई-वडील जनाबाई व मोहन यांच्यासोबत राहत होता. ३ वर्षांपूर्वी आरती आणि चेतन यांचा विवाह झाला होता. मात्र, या दोघांच्या वयात १० वर्षांचं अंतर होतं. तसंच, चेतन सध्या कुठंही कामाला नव्हता. याच वादातून दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते. मंगळवारी रात्री आरतीनं चेतनकडं घर खर्चासाठी एक हजार रुपये मागितले. मात्र, कामाला नसलेल्या चेतनकडं पैसे नसल्यानं आरतीनं चेतनशी वाद घालण्यास सुरूवात केली. यातूनच आरतीनंं चेतनला मुलासोबत माहेरी निघून जाण्याची धमकी दिली. 


दोरीनं गळा आवळून हत्या

दरम्यान, वेळोवेळी आरती ही मोबाइलवर असायची. मंगळवारी रात्री ही आरती पहाटे ४ वा. पर्यंत मोबाइलवर होती. हे पाहून चेतननं तिला मोबाइल बंद करून झोपण्यास सांगितलं. त्यावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. याच वादात राग अनावर झालेल्या चेतननं आरतीचा दोरीनं गळा आवळून हत्या केली. काही मिनिटांनी आपल्याकडून मोठी चूक घडल्याचं लक्षात आल्यानंतर चेतन स्वतः एमआयडीसी पोलिस ठाण्यात हजर झाला. पत्नीच्या मानसिक त्रासाला कंटाळून आपण तिची हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी आरतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर हॉस्पिटलमध्ये पाठविला. त्यानंतर चेतनला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं त्याला १५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.हेही वाचा -

जळगावात उमेदवारीवरून भाजप कार्यकर्ते आपापसातच भिडले

बोगस कंपन्यांच्या मदतीनं सरकारची १२० कोटी रुपयांची फसवणूक, ३ व्यापाऱ्यांना अटकसंबंधित विषय
ताज्या बातम्या