SHARE

प्रेयसीला गावी जाण्यापासून रोखण्यासाठी एका युवकाने असा कारनामा केला, जो ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय रहाणार नाही. कुरारच्या पठाणवाडीत राहणाऱ्या या 21 वर्षाच्या तरुणाने त्याची प्रेयसी लखनऊला जाऊ नये म्हणून कुरार पोलीस ठाण्याच्या कंट्रोलरूमध्ये फोन केला. त्याने रविवारी 7 मे रोजी पोलिसांना सांगितले की, मुंबईहून लखनऊला जाणाऱ्या रेल्वेतून एक आययएसआयचा सदस्य जात असून त्याच्या बॅगेत बॉम्ब ठेवला आहे. हे ऐकताच कुरार पोलिसांना चांगलाच धक्का बसला. 

पोलिसांना ही माहिती देताना त्या तरुणाने त्याच्या प्रेयसीच्या घराचा पत्ता दिला. तरुणाने सांगितलेल्या पत्त्यावर जेव्हा पोलीस पोहचले तेव्हा त्यांना भलतेच चित्र दिसले. तिथे एक मुलगी आणि तिचे वडील मुंबईहून लखनऊ जाण्यासाठी निघाले होते. त्या तरुणाने प्रेयसीला गावी जाण्यापासून रोखण्यासाठी ही सगळी योजना आखली होती. पोलिसांनी तरुणी आणि तिच्या वडिलांना गावी जाण्यापासून रोखत पोलीस ठाण्यात घेऊन आले. यामुळे तरुणाची योजना तर यशस्वी झाली. पण त्या तरुणीने कुरार पोलिसांना तिच्या प्रियकराबद्दलची सर्व हकिकत सांगितली. पोलिसांनी दुसऱ्या दिवशी त्यांना तिकीट काढून देत गावी पाठवले. अफवा पसरवणारा तरुण मात्र घरातून फरार आहे. असे सांगितले जाते की, तो देखील गावी गेला आहे. पोलीस सध्या त्या तरुणाच्या शोधात आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या