दीड लाखांसाठी महेश भट्ट यांच्यावर गोळीबार, गँगस्टर रोडिओवालाची कबुली

२००७ मध्ये रवी पुजारीने प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माते महेशभट्ट आणि करीम मोरानी यांना खंडणीसाठी धमकावले होते. मात्र दोघांनी ही त्याला दाद न दिल्याने रवी पुजारीने ओबेदला दोघांची हत्या करण्यासाठी सुपारी दिली. त्यानुसार ओबेदने मुंबईत स्थायिक असलेला त्याचा भाऊ अनिस याला महेश भट्ट आणि करीम मोरानी यांच्यावर गोळीबार करण्यास सांगितले होते.

दीड लाखांसाठी महेश भट्ट यांच्यावर गोळीबार, गँगस्टर रोडिओवालाची कबुली
SHARES

प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते महेश भट्ट आणि करीम मोरानी यांच्यावर फक्त दीड लाखासाठी हल्ला केल्याची कबुली ओबेद रोडिओवालाने मुंबई पोलिसांना दिली आहे. हे पैसे रवी पुजारीने दिल्याचंही त्याने पोलिसांना सांगितलं. रोडिओवाला सध्या पोलिसांच्या कस्टडीत असून त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी  पोलिसांनी न्यायालयाकडे केली आहे. तसंच हिमेश रेशमियाला धमकवल्या प्रकरणातही त्याचा हात असल्याचा संशय पोलिसांना असून त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.


 भारतातून पलायन

कुख्यात गुंड रवी पुजारी आणि इजाज लकडावाला यांच्यासाठी काम करणाऱ्या रोडिओवालाला २०१७ मध्ये अमेरिकन पोलिसांनी अटक केली. ९० च्या दशकात अंडरवर्ल्डने डोकं वर काढल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केली. त्यावेळी मुंबईच्या रस्त्यावर रिक्षा चालवणारा रोडिओवाला हा अंडरवर्ल्डच्या संपर्कात होता. त्यावेळी अनेक सराईत आरोपींनी भारतातून पळ काढण्यास सुरूवात केली. त्यावेळी रोडिओवाला आणि त्याचा भाऊ अनिस यांच्यावर कुठल्याही गुन्ह्यांची नोंद नव्हती. मात्र दोघेही कुख्यात गुंडाच्या संपर्कात असल्याने पोलिस त्या दोघांवरही लक्ष ठेवून होते. याची कुण कुण लागल्यानंतर रोडिओवालाने परिवारासह अमेरिकेत बनावट पासपोर्टच्या माध्यमातून पळ काढला.


महेश भट्ट यांच्या हत्येचा कट

भारतातून पत्नी आणि ४ मुलांसह पळ काढणारा रोडिओवाला अमेरिकेत त्याच्या मूळ नावानेच स्थायिक झाला.  त्या ठिकाणी तो एका माॅलमध्ये ‘सेल्स रिप्रेझेन्टीव्ह’ म्हणून कामाला लागला. त्याला आठवड्याला १ हजार डाॅलर मिळत होते. मात्र कामाला असतानाही तो रवी पुजारीच्या  संपर्कात होता. २००७ मध्ये रवी पुजारीने प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माते महेश भट्ट आणि करीम मोरानी यांना खंडणीसाठी धमकावलं होतं. मात्र दोघांनीही त्याला दाद न दिल्याने रवी पुजारीने रोडिओवालाला दोघांची हत्या करण्यासाठी सुपारी  दिली.


अनिसने केला गोळीबार 

रोडिओवालाने मुंबईत स्थायिक असलेला त्याचा भाऊ अनिस याला महेश भट्ट आणि करीम मोरानी यांच्यावर गोळीबार करण्यास सांगितलं होतं. या घटनेची माहिती खुद्द रवी पुजारीने दिल्लीतील एका पत्रकाराला दिली. बाॅलिवूड कलाकारांमध्ये रवीची दहशत रहावी. या उद्देशानेच महेश भट्ट आणि करीम मोरानी यांच्या हत्येची सुपारी रवीने दिली होती. त्यानुसार २०१४ साली अनिसने प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माते महेश भट्ट आणि करीम मोरानी यांच्यावर अनिसने गोळीबार केला. त्यासाठी रवी पुजारीने दोन्ही भावांना दीड लाख रुपये वाटून घेण्यास सांगितल्याची महिती रोडिओवालाने पोलिसांना दिली. या प्रकरणात पुढे अनिस याच्यासह १० जणांना पोलिसांनी मकोका कायद्यांतर्गत अटक केली.  


बेकायदेशीर वास्तव्य

अनिसच्या अटकेनंतर रोडिओवाला अमेरिकेत वास्तव्यास असल्याचं पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर २०१५ साली मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अमेरिकेच्या ‘आईसी’ या सुरक्षा यंत्रणांना रोडिओवालाबाबत माहिती दिली. त्यावेळी रोडिओवाला बेकायदेशीररित्या रहात असल्याचं चौकशीत पुढे आल्यानंतर २०१७ मध्ये तेथील सुरक्षा यंत्रणेने त्याला ताब्यात घेतलं.

त्यानंतर रोडिओवालाला भारतात प्रत्यार्पण करण्यासाठीची प्रकिया सुरू करण्यात आली. सोमवारी सुरक्षा यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी रोडिओवालाला भारतात आणलं. मंगळवारी त्याचा ताबा मुंबईच्या खंडणीविरोधी पथकाच्या पोलिसांना मिळाला. न्यायालयाने रोडिओवालाला एक दिवसांची पोलिस कस्टडी दिली खरी, मात्र त्याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवण्यावर आक्षेप घेतला होता. त्यावर पोलिसांनी  त्याच्यावरील गंभीर गुन्ह्यांची नोंद आणि त्याचे कुख्यात गुंडांसोबत असलेल्या संबधांवर न्यायालयाचं लक्ष वेधून घेत, मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात यावा अशी मागणी केली आहे. 


हेही वाचा-

मुंबईत डाॅन बनण्याच्या स्वप्न पडलं महागात


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा