मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ की सोन्याची खाण?

  Mumbai Airport
  मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ की सोन्याची खाण?
  मुंबई  -  

  मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाने केलेल्या कारवाईकडे नजर टाकल्यास हे विमानतळ आहे की सोन्याची खाण? असा प्रश्न नक्कीच पडेल. जानेवारीपासून आत्तापर्यंत मुंबई विमानतळावर तब्बल 120 किलो सोनं पकडण्यात आलं आहे. या सोन्याची किंमत 35 कोटी 38 लाखांच्या घरात आहे.1 जानेवारीपासून हवाई गुप्तचर विभागाने सोने तस्करीची 112 प्रकरणं हाताळली असून या तस्करीदरम्यान विभागाने 50 भारतीय आणि 13 परदेशी नागरिकांना पकडलं आहे.

  फक्त सोनंच नाही तर परदेशी चलन आणि अंमली पदार्थांचा मोठा साठादेखील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन जप्त करण्यात आला आहे. आत्तापर्यंत परदेशी चलनाच्या 18 प्रकरणांत हवाई गुप्तचर विभागाने 3 कोटी रुपयांहून अधिक किमतीचं परदेशी चलन जप्त केलं आहे.

  विमानतळावर झालेल्या ड्रग्जच्या प्रकरणांची संख्या जरी कमी असली तरी त्याचं मूल्य मात्र कोटींच्या घरात आहे. ड्रग्जच्या दोन प्रकरणांत हवाई गुप्तचर विभागाने 7 कोटी 64 लाख रुपयांचे 16.67 किलो वजनाचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणात एका भारतीयासह एका परदेशी नागरिकाला अटक करण्यात आली होती. तस्करीच्या इतर प्रकरणांचा आकडा देखील मोठा असून 19 प्रकरणांत साडेपाच कोटींचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

  24 फेब्रुवारीला मुंबई विमानतळावर आत्तापर्यंतचं सगळ्यात जास्त सोनं पकडण्यात आलं होतं. या दिवशी वेगवेगळ्या 5 प्रकरणांमध्ये 1 कोटी 77 लाख रुपये मूल्याचं 5 किलो सोनं हवाई गुप्तचर विभागाने पकडलं होतं. या सगळ्या प्रकरणात चार आरोपींना पकडण्यात आलं होतं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.