इंद्राणी मुखर्जीची प्रकृती स्थिर, जे.जे.रुग्णालयात उपचार सुरू

गेल्या अडीच वर्षांपासून तुरुंगात असलेल्या इंद्राणी मुखर्जीची प्रकृती शुक्रवारी रात्री अचानक बिघडली. त्यानंतर कारागृह प्रशासनाने तिला तातडीने जे. जे. रुग्णालयात दाखल केलं. इंद्राणीच्या प्रकृतीत झालेल्या बिघाडाचं नेमकं कारण काय? तिने कुठल्या गोळ्यांचं सेवन केलं? हे शोधण्यासाठी वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आहेत.

इंद्राणी मुखर्जीची प्रकृती स्थिर, जे.जे.रुग्णालयात उपचार सुरू
SHARES

प्रकृती बिघडल्याने शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जीला शुक्रवारी रात्री जे. जे. रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आता तिची प्रकृती स्थिर आहे. शिवाय उपचारांना ती चांगला प्रतिसाद देत असल्याचंही डाॅक्टरांनी सांगितलं.


प्रकृती का बिघडली?

गेल्या अडीच वर्षांपासून तुरुंगात असलेल्या इंद्राणी मुखर्जीची प्रकृती शुक्रवारी रात्री अचानक बिघडली. त्यानंतर कारागृह प्रशासनाने तिला तातडीने जे. जे. रुग्णालयात दाखल केलं. इंद्राणीच्या प्रकृतीत झालेल्या बिघाडाचं नेमकं कारण काय? तिने कुठल्या गोळ्यांचं सेवन केलं? हे शोधण्यासाठी वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे.


इंद्राणीची प्रकृती आता स्थिर असून ती औषधांना प्रतिसाद देत आहे. शुक्रवारच्या तुलनेत तिची तब्येत आज ठिक आहे. तिची एमआरआय आणि रक्ताची तपासणी करण्यात आली आहे. अद्याप तिचा वैद्यकीय अहवाल आलेला नाही. अहवाल मिळाल्यावर तिच्यावर पुढील उपचार काय करायचे ते ठरवण्यात येईल.
- डॉ. सुधीर डी. नानंदकर, अधिष्ठाता, जे. जे. हॉस्पिटल


सीबीआयचे आरोप

बहुचर्चित शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि शीनाची आई इंद्राणी मुखर्जी तसंच तिचा पहिला पती संजीव खन्ना आणि दुसरा पती पीटर मुखर्जी यांच्यावर शीनाच्या हत्येचा कट रचणे, तिचे अपहरण करणे, त्यानंतर तिची हत्या करणे, गुन्ह्याबाबत खोटी माहिती देऊन दिशाभूल करणे आणि पुराव्यांची विल्हेवाट लावणे असे आरोप सीबीआयने ठेवले आहेत. याव्यतिरिक्त तिघांवर शीनाचा भाऊ मिखाईल याच्या हत्येचा प्रयत्न करण्याचा कट रचल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.


काय आहे प्रकरण?

२४ एप्रिल २०१२ रोजी शीनाची हत्या करण्यात आली. ऑगस्ट २०१५ मध्ये इंद्राणीला शीनाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली. तिचा माजी चालक आणि याप्रकरणी माफीचा साक्षीदार बनलेला श्यामवर राय याला पोलिसांनी सर्वप्रथम अटक केली होती. पीटरच्या पहिल्या पत्नीचा मुलगा राहुल आणि शीना यांच्यामधील प्रेमसंबंध पसंत नसल्याने ही हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. मालमत्तेचा मुद्दाही यात आहे.



हेही वाचा-

एसआरए घोटाळ्यातील ३३ फ्लॅट जप्त, बाबा सिद्दीकाचा सहभाग उघड

मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी आरोपपत्र सादर, लैंगिक अत्याचाराचा उल्लेख मात्र नाही



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा