COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,87,521
Recovered:
57,42,258
Deaths:
1,18,795
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,453
570
Maharashtra
1,23,340
8,470

Ganesh Festival 2020: घरगुती गणेशमूर्तीं फक्त २ फुटांचीच! राज्य सरकारची सूचना

कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याकरीता काही मार्गदर्शक सूचना शनिवार ११ जुलै रोजी जारी केल्या आहेत.

Ganesh Festival 2020: घरगुती गणेशमूर्तीं फक्त २ फुटांचीच! राज्य सरकारची सूचना
SHARES

कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याकरीता काही मार्गदर्शक सूचना शनिवार ११ जुलै रोजी जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक मंडळाकरीता गणेशाची मूर्ती ४ फूट आणि घरगुती गणपतीसाठी २ फुटाची मर्यादा सरकारकडून घालून देण्यात आली आहे.

कोरोना (Covid-19) मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे यावर्षीचा गणेशोत्सव हा साधेपणाने साजरा करण्याचे ठरविण्यात आलं आहे. त्यासाठी शासनाने पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. असून या सर्व सूचनांचं तंतोतंत पालन सर्व गणेश मंडळांनी  करावं, असं आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे.

या मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे:

१)सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सर्व संबंधित सार्वजनिक गणेश मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासनाची त्यांचे स्थानिक धोरणानुसार यथोचित पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे.

२) covid-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि महापालिका तसंच संबंधित स्थानिक प्रशासन यांचे मंडपाबाबतचं धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत. यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणं अपेक्षित असल्याने घरगुती तसंच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी.

३) श्री गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरिता ४ फूट व घरगुती गणपतीसाठी २ फुटाच्या मर्यादित असावी.

४)यावर्षी शक्यतो पारंपरिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातू संगमरवर आदी मूर्तीचं पूजन करावं. मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास त्याचं विसर्जन शक्यतो घरच्याघरी करावं. घरी विसर्जन करणं शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावं. गणेश मूर्तीचे विसर्जन पुढे ढकलणं शक्य असल्यास त्या मूर्तीचं विसर्जन माघी गणेशोत्सव विसर्जनाच्या वेळी किंवा २०२१ च्या भाद्रपद महिन्यात म्हणजेच पुढील वर्षाच्या विसर्जनाच्यावेळी करता येणं शक्‍य आहे. जेणेकरून श्री गणेशाचं आगमन/ विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळता येऊ शकते. यामुळे स्वतःचं व कुटुंबियांचं कोरोना साथीच्या रोगांपासून रक्षण होईल.

५) उत्सवाकरिता देणगी/ वर्गणी स्वेच्छेने दिलास त्याचा स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असं पहावं. तसंच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.

६) सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/ शिबिरे उदा. रक्तदान शिबिर आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना,मलेरिया, डेंग्यू असे आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय त्याचप्रमाणे स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.

७) आरती, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही तसंच ध्वनिप्रदूषण संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावं. 

८) श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन केबल नेटवर्क वेबसाईट व फेसबुक इत्यादींद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.

९) गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण करावं तसंच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचं (फिजिकल डिस्टेंसिंग) तसंच स्वच्छतेचे नियम मास्क, सॅनिटायझर इत्यादी पाळले जाईल, याकडे विशेष लक्ष देण्यात यावं.

१०) श्री च्या आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावं. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्यादृष्टीने विसर्जन स्थळी जाणं टाळावं. संपूर्ण चाळीतील अथवा इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रित काढण्यात येऊ नये.

११) महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आदींच्या मदतीने कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात यावी.

 १२) covid-19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचं अनुपालन करणं बंधनकारक राहील. तसंच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्याचं देखील अनुपालन करावं.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा