एअरपोर्ट पोलिस ठाण्यातली 'मर्दानी'

मुंबईतील ८ पोलिस ठाण्यांची जबाबदारी महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या खांद्यावर टाकण्यात आल्याने मुंबई पोलिसांचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. यापैकी अतिसंवेदनशील अशा एअरपोर्ट पोलिस ठाण्याची जबाबदारी असलेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अलका मांडवे यांच्याशी 'मुंबई लाइव्ह'ने केलेली ही खास बातचीत.

एअरपोर्ट पोलिस ठाण्यातली 'मर्दानी'
SHARES

देशाची आर्थिक राजधानी मुंबई कायमच दहशतवाद्यांच्या केंद्रस्थानी असते. कुठून कधी केव्हा एखादी अनुचित घटना घडेल, याचा नेम नाही. शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासोबतच सण-उत्सव आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी पोलिसांना नेहमीच अलर्ट राहावं लागतं. त्यादृष्टीने शहरातील प्रत्येक पोलिस ठाणं महत्त्वाचं ठरतं. त्यातच मुंबईतील ८ पोलिस ठाण्यांची जबाबदारी महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या खांद्यावर टाकण्यात आल्याने मुंबई पोलिसांचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. यापैकी अतिसंवेदनशील अशा एअरपोर्ट पोलिस ठाण्याची जबाबदारी असलेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अलका मांडवे यांच्याशी 'मुंबई लाइव्ह'ने केलेली ही खास बातचीत.


पोलिस दलातील स्पर्धेकडे पाहता ही संधी मिळेल असं वाटलं होतं का?

मी मूळची पुण्याच्या जुन्नरमधील. आई-वडिलांनी मोठ्या मेहनतीने आम्हाला शिकवलं. घरची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन मी चांगल्या नोकरीच्या शोधात असताना, १९९२ साली मुंबई पोलिस दलात दाखल झाले. त्यावेळी जेमतेम मुलीच पोलिस भरतीसाठी प्रयत्न करायच्या आणि त्यातील अत्यंत मोजक्या मुली प्रत्यक्ष कामावर रूजू व्हायच्या. त्यामुळे मुंबईतील बहुतांश पोलिस ठाण्यात अत्यंत नगण्य महिला पोलिस असायच्या. त्यामानाने आता महिला पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढली असली, तरी त्यावेळी आपल्याला एवढी मोठी संधी मिळेल, असं खरंच वाटलं नव्हतं.



आयुक्तांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल काय सांगाल?

महिला अधिकारी घर, मुलं संभाळून पोलिस ठाण्यातील जबाबदारीचं काम सांभाळू शकतील काय? अशा मानसिकतेचे पूर्वीचे वरिष्ठ अधिकारी असायचे. त्यामुळे महिला अधिकाऱ्यांना कायम साईड पोस्टींगची नियुक्ती दिली जायची. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. महिलांनाही कामात समान दर्जा दिला जात आहे. त्यांना कुठलंही काम करण्यास सक्षम समजलं जात आहे. ही नक्कीच आनंदाची बाब आहे. आयुक्तांचा हा पोलिस दलातील निर्णय सर्वच महिला कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.


एअरपोर्ट पोलिस ठाण्यातील आव्हाने कुठली?

मुंबई विमानतळ परिसर अतिसंवेदनशील आहे. या ठिकाणी घडणाऱ्या कुठल्याही संशयास्पद गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रत्येक गोष्ट बारकाईने निरखून पहाव्या लागतात. कायम सतर्क रहावं लागतं. २४ तास अलर्ट राहून सहकाऱ्यांना मार्गदर्शन करावं लागतं. मुंबईचे पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा मी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करत आहे.



मुंबईतील परिस्थितीबद्दल काय सांगाल?

माझं महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाल्याने मुंबईला येण्याचा कधीही संबध आला नव्हता. १९९२ मध्ये ज्यावेळी मी पोलिस सेवेत दाखल झाले. त्यावेळी पहिल्यांदा मुंबईला आले. आमचं कुणीही नातेवाईक मुंबईत स्थायिक नव्हतं. अशातच ९२ च्या दंगलीमुळे मुंबईचे वातावरण गढूळ झालं होतं. त्यामुळे कुटुंबाला माझी काळजी वाटयची. मात्र खाकी वर्दी अंगावर चढवल्यावर मनातील सर्व भिती निघून जायची.


कुठल्या घटनेमुळे आत्मविश्वास वाढला?

माझी सर्वात पहिली नियुक्ती देवनार पोलिस ठाण्यात झाली होती. त्यावेळच्या कठीण परिस्थितीत मी अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यानंतर गावदेवी, नवी मुंबई कंट्रोल, शिवडी, विलेपार्ले, क्राईम ब्रांच अशा विविध ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. २००९ मध्ये शिवडीतील डबल मर्डर केस आणि अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची केस पूर्णपणे एकटीने सांभाळली, यातील आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यावर माझ्यातील आत्मविश्वास वाढला.



हेही वाचा-

कुरियर बॉय बनून चौघांनी वृद्ध महिलेला लुटलं

गुंगीचं औषध पाजून तरुणीवर बलात्कार, गुजरातच्या व्यावसायिकाला अटक



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा