भीक मागण्यासाठी मुंबईतून लहान मुलांचं अपहरण

पुण्याहून मुंबईकडे येताना रेल्वे प्रवासात वर्षाची आरोपीच्या कुटुंबीयांशी ओळख झाली होती आणि त्यांनीच आपल्या मुलांचं अपहरण केलं असल्याची माहिती तिने पोलिसांना दिली.

भीक मागण्यासाठी मुंबईतून लहान मुलांचं अपहरण
SHARES

मुंबई उपनगरातून भीक मागण्यासाठी मुलांचं अपहरण करणाऱ्या एका टोळीला कांजूरमार्ग पोलिसांनी गजाआड केलं आहे.

वर्षा कांबळे ह्यांचा दोन लहान मुलांचं कांजूरमार्ग येथील फुटपाथवरून अपहरण करण्यात आलं होतं. यानंतर वर्षा कांबळे यांनी कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात आपल्या मुलांचं अपहरण झाल्याची तक्रार करत गुन्हा दाखल केला होता.

पुण्याहून मुंबईकडे येताना रेल्वे प्रवासात वर्षाची आरोपीच्या कुटुंबीयांशी ओळख झाली होती आणि त्यांनीच आपल्या मुलांचं अपहरण केलं असल्याची माहिती तिने पोलिसांना दिली.

गुन्हा दाखल होताच गुन्हातील गांभीर्य पाहता पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड ( परिमंडळ ७) यांनी परिमंडळ सातमधील घाटकोपर, कांजूरमार्ग, विक्रोळी, पार्क साईट, नवघर आणि मुलुंड या पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि अंमलदार यांचे विशेष पथक बनवले.

मात्र पोलिसांकडे आरोपीबाबत कोणतेही ठोस पुरावे फोटो किंवा मोबाइल नंबर असे काही नव्हते. तरीदेखील तांत्रिक तपासाच्या आधारावर आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी शोध घेण्यात सुरुवात केली.

कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपींची ओळख काढण्यात पोलिसांना यश आलं. या गुन्ह्यात सर्व आरोपी हे काळे कुटुंबीय होते.

मुलांचे अपहरण करून काळे कुटुंब ठाणे, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर, औरंगाबाद या शहरात फिरत होते. या मुलांचे अपहरण करून उदरनिर्वाहासाठी त्यांना भीक मागायला लावणार होते. तांत्रिक बाबी आणि खबऱ्यांच्या मदतीने अखेर पोलिसांनी काळे कुटुंबीयांना अकरा दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर अटक केली.
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील जळगाव या ठिकाणी छापा टाकत पोलिसांनी आरोपींना अटक केली. ज्या दोन मुलांचे अपहरण केले होते, त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुख्य सूत्रधार हा हर्षद काळे होता. हर्षद काळेसोबत चंदू काळे आणि ताराबाई काळे यांना पोलिसांनी अटक केली आहे. हर्षद काळे याची पत्नी पोर्णिमा काळे हे अद्याप फरार आहे.संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा