विजय मल्ल्याला लंडनमध्ये अटक आणि सुटका


SHARE

भारतीय बँकांचे तब्बल ९ हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज बुडवून लंडनमध्ये पळून गेलेला एकेकाळचा स्वयंघोषित मद्यसम्राट विजय मल्ल्या याला लंडन पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र काही वेळातच स्थानिक न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने त्याची सुटका करण्यात आली. 

ब्रिटनसोबत झालेल्या प्रत्यार्पण कराराअंतर्गत 'ईडी'ने ब्रिटन सरकारकडे मल्ल्याचा ताबा मागितला आहे. या प्रत्यार्पणाच्या प्रकरणावर ४ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

अंमलबजावणी संचालनालया (ईडी)च्या तक्रार अर्जानंतर लंडन पोलिसांनी पैशाच्या अफरातफरी (मनी लाड्रींग कायद्यांतर्गत)प्रकरणी मल्ल्याला ताब्यात घेतल्याचे वृत्त दूरदर्शन या सरकारी वाहिनीने दिले.  

यापूर्वी न्यायालयासमोर हजर राहण्यास सांगूनही सतत गैरहजर राहणाऱ्या मल्ल्याला १८ एप्रिल २०१७ रोजी अटक करण्यात आली होती. परंतु अटकेनंतर अवघ्या ३ तासांमध्येच स्थानिक वेस्टमिनिस्टर मॅजिस्ट्रेटने ६५०,००० पाऊंडच्या जातमुचलक्यावर त्याला जामीन मंजूर करण्यात आला. मे महिन्यात सीबीआय आणि ईडीची ४ सदस्यीय पथक ब्रिटनला पोहोचले होते. तिथे या पथकाने संबंधीत अधिकाऱ्यांना मल्ल्याविरुद्ध कर्ज न फेडण्याबाबतच्या प्रकरणांची संपूर्ण माहिती दिली. लंडन न्यायालयाने हे पुरावे ग्राह्य धरत त्याच्या अटकेचे आदेश दिले.


फरार मल्ल्याची हेराफेरी

 • किंगफिशर एअरलाइन्सवर ३१ जानेवारी २०१४ पर्यंत ६,९६३ कोटी रुपयांचे कर्ज
 • त्यात व्याजाची भर पडून मल्ल्या प्रवर्तक असलेल्या कंपनीच्या डोक्यावर ९००० कोटींहून अधिक रुपयांचे कर्ज
 • स्टेट बँक आॅफ इंडियासहित एकूण १७ बँकांकडून कर्ज
 • किंगफिशर एअरलाइन्स २०१२ मध्ये बंद, तर २०१४ मध्ये एअरलाइन्सचा परवाना रद्द
 • मार्च २०१६ मध्ये मल्ल्याचा लंडनमध्ये पळ
 • प्रिव्हेंशन आॅफ मनी लाॅड्रिंग अॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत गुन्ह्याची नोंद
 • सीबीआयने मल्ल्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल केले 
 • त्यातील एक आयडीबीआय बँकेशी संबंधीत 
 • दुसरा गुन्हा एसबीआयच्या नेतृत्वातील बँकांच्या समुहाने दिलेल्या तक्रारीनुसार दाखल 
 • जून २०१६ मध्ये 'ईडी'च्या मागणीनुसार मुंबईतील विशेष न्यायालयाकडून फरार घोषित
 • दीड वर्षांहून अधिक काळ लंडनमध्ये वास्तव्य
 • मुंबई, बंगळुरूतील १,४११ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय