कुर्ल्यात घरफोडी करणारी टोळी गजाआड


कुर्ल्यात घरफोडी करणारी टोळी गजाआड
SHARES

विनोबा भावे नगर पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या एका सराईत टोळीतील चार आरोपींना गजाआड केलं आहे. पोलीस असल्याची बनावणी करून एका दाक्षिणात्य कुटुंबाच्या घरात चोरी करून हे चौघेही फरार झाले होते. मात्र पोलिसांनी यशस्वी तपास करून या टोळीचा म्होरक्या संजय म्हात्रे (४७) सह राजेंद्र बनसोडे, सुरेश मोकाशी आणि संतोष जाधव या चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २ मे रोजी दुपारच्या सुमारास कुर्ल्यातील एका दाक्षिणात्य व्यापाऱ्याच्या घरात हे चौघेजण घुसले. आपण चौघेही पोलीस असून या घरात अनधिकृत कृत्य चालत असल्याचा दावा करत त्यांनी व्यापाऱ्याकडे कपाट उघडण्याची मागणी केली. मात्र व्यापाऱ्याने कपाटाची चावी नसल्याचं सांगितल्यावरही हे चौघे ऐकण्याच्या मनःस्तिथीत नव्हते. अखेर त्यांनी हातोडी घेऊन कपाट उघडलं आणि त्यातील १ लाख ८६ हजार रुपये घेऊन पसार झाले.

ज्या इमारतीत या चौघांनी चोरी केली त्यात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने हे चोर कोण होते आणि ते कुठून आले होते याचा पोलिसांना थांगपत्ता लागत नव्हता. अखेर पोलिसांनी केलेल्या चौकशीत एका सुरक्षा रक्षकाने चौघांना इमारतीत प्रवेश करताना बघितल्याचं पुढे आलं. हे चौघेही एका लाल रंगाच्या स्विफ्ट गाडीने आले होते. एवढा पुरावा पोलिसांचा तपास पुढे नेण्यासाठी पुरेसा होता.

"आम्ही या परिसरातील सगळे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तेव्हा आम्हाला एक लाल रंगाची स्विफ्ट गाडी दिसली. या गाडीचा नंबरही संशयास्पद वाटल्यानं आम्ही तात्काळ या गाडीच्या मालकाला गाठलं. चौकशीत ही गाडी आरोपींच्या नातलगाची असल्याचं स्पष्ट झालं. त्याआधारे आम्ही चारही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती तपास अधिकारी गणेश मोहिते यांनी दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा