वैभव राऊतसह ११ जणांविरोधात दोषारोपपत्र सादर


वैभव राऊतसह ११ जणांविरोधात दोषारोपपत्र सादर
SHARES

राज्यात घातपाती कारवाईच्या प्रयत्नात असलेल्या वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर सह त्यांच्या नऊ जणांविरोधात महाराष्ट्र दहशतवादीविरोधी पथका (एटीएस) ने दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. हजार एक पानांचे हे दोषारोपपत्र असून त्यामध्ये जमवण्यात आलेला शस्त्रसाठा, महत्वाची कागदपत्रे, मेमरी कार्ड, काही जागांची छायाचित्रे, आरोपींसह काही संशयितांचे जबाब यांचा समावेश आहे. या प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्यांच्या मागावर आहे. 


शस्त्रसाठा हस्तगत 

पुणे, सातारा, सोलापूर, मुंबई, नालासोपारा या ठिकाणी घातपाताच्या प्रयत्नात असलेल्या वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा जोंधळेकर यांना ७ आॅगस्ट रोजी महाराष्ट्र एटीएसच्या पोलिसांनी अटक केली होती. या तिघांच्या चौकशीनंतर एटीएसने राज्यभरातील या टोळीच्या विविध ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत केला होता.  त्यामध्ये १५ देशी बनावटीची पिस्तुल, ३ अर्धवट पिस्तुल, ९ एमएमची ११ कार्टेजस, ७.६५ एमएमची ३० कार्टेजस, पिस्तुल बनवण्यासाठी लागणारे पार्ट्सही वैभवने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी हस्तगत केले आहेत.


घरी शस्त्रे बनवली

 सुधन्वाच्या चौकशीतून एटीएसने पुणे इथं केलेल्या कारवाईत १ लॅपटाॅप, ५ हार्डडिस्क, ५ पेन ड्राइव्ह, ९ मोबाइल, अनेक सिमकार्ड. १ वायफाय डोंगल, १ कार, १ दुचाकी, आणि काही महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचा नकाशा व पुणे, सातारा आणि नालासोपारा परिसराचा समावेश आहे. या टोळीने घातक शस्त्रे विकत घेण्याचा प्रयत्न केल्यास गुप्त माहितीदारांच्या मदतीने पोलिसांच्या जाळ्यात अडकण्याची भीती होती. त्यामुळे उत्तर भारतातून छुप्या पद्धतीने देशी कट्टे बनवणाऱ्यांचं मार्गदर्शन घेऊन या तिघांनी घरबसल्या घातक शस्त्रे बनवण्याचं काम सुरू केलं होतं. सामाजिक कामांच्या आड तिसराच हेतू साधण्याच्या तयारीत असलेल्या तिघांच्या कटाची माहिती पोलिसांना वेळीच मिळाल्याने हे प्रकरण उघडकीस आलं.


१० पथकं

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यभरात १० हून अधिक पथकं या प्रकरणाच्या तपासाच्या दृष्टीकोनातून कार्यरत आहेत. पोलिसांच्या तपासात यातील काही आरोपी हे सनातन या हिंदू संस्थेचे साधक असल्याचंही पुढे आलं आहे. तसंच अनिसचे डाॅ. नरेंद्र दाभोळकर, गौरी लंकेश आणि काॅ. गोविंद पानसरे यांच्या हत्येमागेही या टोळीचा हात असल्याचे पुढे आलं होतं.

या प्रकरणात पोलिसांनी आरोपींच्या चौकशीनंतर एटीएसच्या अधिकाऱ्यांनी श्रीकांत पांगरकर, अविनाश पवार, लिलाधर उखर्डु लोधी, वासुदेव सुर्यवंशी, सुजीत कुमार, उर्फ मंजुनाथ उर्फ प्रविण रंगास्वामी, भारत कुरणे, अमोल काळे, अमित रामचंद्र बड्डी, गणेश मस्किन यांची नावे पुढे आल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. या आरोपींविरोधात एटीएसने बुधवारी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.   




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा