मुंबईच्या उच्चभ्रूवस्तीत काम मिळवत चोऱ्या करणाऱ्या एका सराईत मोलकरणीला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. भारती शिंदे उर्फ कविता असं या महिलेचं नाव असून तिच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात चोरीच्या अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून पोलिस तिच्या मागावर होते. ओशिवरा परिसरात तिनं एका घरात पाच लाखांची चोरी केली होती.
अंधेरी लोखंडवाला परिसरात रहात असलेल्या एका उच्चभ्रू व्यक्तीच्या घरी कविता नोव्हेंबर २०१७ मध्ये कामाला होती. काही दिवसांतच तिने घरातल्यांचा विश्वास जिंकला. घरातील तिजोरी आणि इतर मौल्यवान दागिने कुठे ठेवले जातात याचीही तिने रेकी करून ठेवली होती. दरम्यान ८ नोव्हेंबर रोजी घराचे मालक कामावर निघून गेल्यानंतर त्यांची पत्नी घरात एकटीच होती. मुलाला शाळेत सोडून ती अंघोळीसाठी गेली असताना संधी साधून कविताने घरातील तिजोरीतून लाखो रुपयांचे दागिने घेऊन पसार झाली. दरम्यान घर मालकीण बाहेर आल्यानंतर तिला घरातील सामान विसकटलेले आढळून आले. शिवाय तिजोरीही उघडी दिसून आली.
घर मालिकीणीने तिजोरीत पाहिले असता मौल्यवान दागिनेच जागेवर नव्हते. त्यावेळी त्या महिलेने कविताला आवाज दिला असता ती घरात नव्हती. त्यामुळे कवितावरच संशय आल्याने त्या महिलेने कविता विरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
मागील अनेक दिवसांपासून कविताच्या मागावर असलेल्या पोलिसांना तिचा थांगपत्ता लागत नव्हता. दरम्यान कविता विरारच्या फुलपाडा रोडवरील जीवन अपार्टमेंटमध्ये रहात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिला तेथूनच अटक केली. न्यायालयाने तिला पोलिस कोठडी सुनावली असून पोलिस तिने अशा प्रकारे किती ठिकाणी चोऱ्या केल्या? याची माहिती गोळा करत आहेत.