सिद्धिविनायक मंदिरात शाॅक लागून तरूणाचा मृत्यू

संकष्टी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिर परिसरात सजावटीचं काम सुरू असताना एका तरूणाला विजेचा धक्का बसून त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी दादर पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सिद्धिविनायक मंदिरात शाॅक लागून तरूणाचा मृत्यू
SHARES

प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिर परिसरात विजेचा शाॅक लागून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. मोहम्मद नसीम (२२) असं या मृत तरुणाचं नाव आहे. संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिर परिसरात सजावटीचं काम सुरू असताना हा दुर्दैवी प्रकार घडला. या प्रकरणी दादर पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


कशी घडली घटना?

मूळचा उत्तर प्रदेशच्या मनापूरचा राहणारा मोहम्मद नसीम हा तरूण शिवडी परिसरात त्यांच्या गावातल्या व्यक्तींसोबत राहतो. नसीमला वडील नसल्यामुळे मोठा भाऊ आणि त्याच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पडली. त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडून वर्षभरापूर्वी नसीम मुंबईला आला होता.



डेकोरेटींगचं काम

मुंबईत मिळेल ते काम नसीम करायचा. सध्या नसीम हा मनिष डेकोरेटर्सकडे हेल्पर म्हणून काम करत होता. प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदीरात संकष्टी निमित्ताने करण्यात येणाऱ्या सजावटीचं काम डेकोरेटर्सचे मालक मनिष यांना मिळालं होतं. त्यानुसार सोमवारी रात्री सजावटीच्या कामासाठी मोहम्मद मंदिर परिसरात काम करत होता.


बॅरिकेट्सपर्यंत विजेचा प्रवाह

याचवेळी विजेचा प्रवाह तेथील बॅरिकेट्सपर्यंत पोहोचला. दुर्दैवाने नसीमने या बॅरिकेट्सवर हात ठेवल्यामुळे त्याला विजेचा जोराचा झटका बसला. या धक्क्याने तो जागीच बेशुद्ध झाला. बेशुद्ध नसीमला इतर सहकाऱ्यांनी परळच्या केईएम रुग्णालयात हलवलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं डाॅक्टरांनी घोषित केलं.

या प्रकरणी दादर पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती दादर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिवाकर शेळके यांनी सांगितलं.



हेही वाचा-

गुंगीचं औषध पाजून तरुणीवर बलात्कार, गुजरातच्या व्यावसायिकाला अटक

पोक्सोप्रकरणातील फ्रेंच ट्रस्टीचा जामिन अखेर रद्द



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा