सावधान! ब्रॅंडेड दुधाच्या पिशवीत भेसळयुक्त दूध, भेसळखोरांचं रॅकेट उघड


सावधान! ब्रॅंडेड दुधाच्या पिशवीत भेसळयुक्त दूध, भेसळखोरांचं रॅकेट उघड
SHARES

दुधात भेसळ करणाऱ्या टोळ्या मुंबईत सक्रिय असून या टोळ्या ग्राहकांची कशी फसवणूक करत आहेत हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. अमुल आणि गोकुळसारख्या ब्रँडेड दुधाच्या पिशव्या फोडून त्यातील अर्ध दूध काढून त्यात पाणी ओतून पुन्हा पिशव्या पॅक करून भेसळयुक्त दूध बाजारात विकणाऱ्या अशाच एका टोळीचा पर्दाफाश अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)नं केला आहे.


४५० लीटर दुधाचा साठा जप्त

खार पश्चिम इथं मंगळवारी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी तीन ठिकाणी छापे टाकत ४५० लीटर दुधाचा साठा जप्त करत नष्ट केल्याची माहिती शैलेश आढाव, सहआयुक्त (बृहन्मुंबई) अन्न यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे. तर दुधात भेसळ करणाऱ्या ४ जणांना यावेळी अटक करण्यात आली असून एफडीए आणि पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू असल्याची माहितीही आढाव यांनी दिली आहे.


अशी करायचे भेसळ

खार पश्चिम येथील झोपडपट्ट्यांमध्ये दुधात भेसळ करणाऱ्या टोळ्या कार्यरत असल्याची माहिती एफडीएच्या गुप्तवार्ता विभागाला मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास एफडीएच्या अधिकाऱ्यांनी खारमधील तीन ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी या तिन्हीही ठिकाणी अमुल आणि गोकुळसारख्या ब्रँडेड दुधाच्या पिशव्या फोडून त्यातील निम्मं दुध काढून त्यात पाणी भरलं जात होतं.

त्यानंतर या पिशव्या आधी फोडण्यात आल्या होत्या हे कुणालाही कळणार नाही, इतक्या चतुराईनं रिपॅक केल्या जात असल्याचं यावेळी निदर्शनास आलं. त्यानुसार एफडीएनं ४ भेसळखोरांना रंगेहाथ पोलिसांच्या ताब्यात दिलं असून त्यांच्याविरोधात अन्न सुरक्षा मानके कायदा आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान आणखी एका भेसळखोरावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून हा भेसळखोर मात्र फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत असल्याचं एफडीएकडून सांगण्यात आलं आहे.


'दुधाची पिशवी तपासूनच घ्या'

अटक करण्यात आलेल्यांची नावं आनंदा रेड्डी लिंगारेड्डी, यादगिरी मल्लया नोगिली, सबिता श्रीनिवास कर्नाटी आणि व्यंकटेश गुंडाला अशी आहेत. तर श्रीनिवास रामलु कर्नाटी हा फरार आहे. ही टोळी पहाटे-पहाटे दुधात भेसळ करून भेसळयुक्त दुध आसपासच्या सोसायट्यांमध्ये विकत असल्याचंही यावेळी उघड झालं आहे. त्यामुळं ग्राहकांनी दुध खरेदी करताना योग्य ती काळजी घ्यावी, दुधाची पिशवी तपासून घ्यावी असं आवाहन आढाव यांनी केलं आहे.

यावेळी तीन ठिकाणाहून एफडीएनं ४५० लीटर दूध जप्त करत त्वरीत नष्ट केलं आहे. या दुधाची किंमत १६ हजार रुपये असून दुधाचे ४ नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या नमुन्याच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचंही आढाव यांनी स्पष्ट केलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा