दिवसाढवळ्या अल्पवयीन मुलाचे अपहरण

मुंबईच्या परळ परिसरातून दिवसाढवळ्या अल्पवयीन मुलाला मदतीच्या नावाखाली नेऊन लुबाडल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, प्रसंगावधान दाखवून या मुलाने आरोपीच्या तावडीतून स्वतःची सुटका केली

दिवसाढवळ्या अल्पवयीन मुलाचे अपहरण
SHARES

मुंबईच्या परळ परिसरातून दिवसाढवळ्या एका १६ वर्षीय मुलाला मदतीच्या नावाखाली नेऊन लुबाडल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, प्रसंगावधान दाखवून या मुलाने आरोपीच्या तावडीतून स्वतःची सुटका केली.  घडलेल्या प्रकारामुळे हा तरुण मानसिक तणावाखाली आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.  



पत्ता विचारण्याचा बहाणा

परळच्या टाटा कम्पाऊड परिसरात राहणारा अनुराग सिंग परळ येथील महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. अनुरागच्या वडिलांना डेंग्यूची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर परळच्या ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वडिलांना भेटून काकी आणि बहिणीसोबत अनुराग टॅक्सीची वाट पहात सिमेंट चाळ येथे थांबला होता. त्यावेळी एका टॅक्सीवाल्यासोबत भाडे नाकारण्यावरून त्याच्या काकीचा वाद सुरू होता. यावेळी दुचाकीहून आलेल्या एका व्यक्तीने अनुरागला पत्ता विचारला. तसंच पत्ता शोधण्यास मदत करण्याचा आग्रह त्या व्यक्तीने अनुरागला केला. अनुरागने त्याला टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती व्यक्ती त्याच्या मागे हात धुवून लागली. अखेर अनुराग काकी आणि बहिणीला न सांगताच त्याच्यासोबत गेला. 


निर्जनस्थळी नेलं

दादर येथील कोहीनूर शोरूमजवळ काचेचा तुकडा शोधण्याचा तो इसम प्रयत्न करत होता. दादरमध्ये १२ इंची काचेचा धारदार तुकडा घेऊन तो त्याने अनुरागकडे दिला. मात्र,  अनुराग घरी जाण्याचा आग्रह करत असल्याने त्या व्यक्तीने त्याला घरी सोडण्याचे आश्वासन देत सोबत नेले. वडाळा, अॅण्टाॅप हिलमार्गे त्याने अनुरागला दुचाकीहून विद्याविहार स्थानकाजवळील झाडाझुडपात नेले. निर्जनस्थळी घाणीत उभे करत त्याने  अनुरागकडून काचेचा तुकडा घेत, त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि हातातील ब्रेसलेट हिसकावले.


पोलिसांचं दुर्लक्ष

त्याचवेळी आरोपीला फोन आल्याने तो फोनवर बोलण्यासाठी थोडा बाजूला गेला. ते पाहून अनुरागने स्वतःजवळील फोनने वडिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो आरोपी लगेचच त्याच्याजवळ आल्याने त्याने फोन कट केला.  अनुरागचा मिसकॅाल पाहून त्याच्या वडिलांनी पुन्हा फोन केला. फोनची रिंग ऐकून आरोपीने त्याच्याजवळून मोबाइलही हिसकावून घेत, पुन्हा फोनवर बोलण्यासाठी बाजूला निघून गेला. हीच संधी साधत अनुरागने तेथून पळ काढला. तो धावत विद्याविहार स्थानकावर पोहचला. त्या ठिकाणी तैनात असलेल्या रेल्वे पोलिसांची त्याने मदत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनुराग खोटे बोलत असल्याचा संशय घेत त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. 


लोकलमध्ये प्रवाशाची मदत

त्यानंतर अनुरागने सीएसटी लोकल पकडली. रेल्वे डब्यात त्याने अनेकांना आई-वडिलांना संपर्क करण्यासाठी मोबाइल मागितला. मात्र, तेव्हाही कुणी मदतीचा हात पुढे केला नाही. अखेर एका व्यक्तीने अनुरागला फोन दिला. घरी ही बाब सांगितल्यानंतर परळ स्थानकावर  अनुरागची बहीण त्याला घेण्यासाठी आली. त्यानंतर कुटुंबियांनी भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
 

याअाधीही अशीच घटना

 अनुरागला ज्या ठिकाणी आरोपीने नेले त्या ठिकाणी तो पोलिसांना घेऊन गेला. पोलिसांनी तेथे एका महिलेकडे चौकशी केली. असाच एक प्रकार या आधी काही दिवसांपूर्वीही एका मुलासोबत घडल्याचं त्या महिलेनं सांगितलं. अनुरागने दिलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी सराईत आरोपींचे फोटो दाखवल्यानंतर त्यातील एकावर त्याने संशय व्यक्त केला आहे. त्यानुसार पोलिस त्या सराईत आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती अनुरागच्या वडिलांनी दिली.  



हेही वाचा - 

बलात्काराचा प्रयत्न अयशस्वी झाल्यावर अात्महत्या

चोरट्यांना ऑनलाईन शॉपिंग पडली महागात




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा