चोरट्यांना ऑनलाईन शॉपिंग पडली महागात


चोरट्यांना ऑनलाईन शॉपिंग पडली महागात
SHARES

बँकेतून किंवा विविध व्यवहारीक कार्यालयातून बोलत असल्याचं सांगत नागरिकांना ऑनलाईन गंडा घालणाऱ्या चोरट्यांनाच ऑनलाईन शॉपिंग करणं महागात पडलं आहे. याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी शुभकरण उर्फ लाला ब्रिजलाला सिंह (26), अभिलाष उर्फ गौतम करण सिंह (18) या दोन आरोपींना अटक केली आहे. नागरिकांना फसवून लुटलेल्या पैशातून केलेल्या ऑनलाईन शॉपिंगचा माग काढत पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.


संपूर्ण प्रकार

दोन्ही आरोपी मूळचे उत्तर प्रदेशच्या मौदहा बिगहाना गावात राहणारे आहेत. यातील शुभकरण हा शेती करतो. तर अभिलाष हा शिक्षण घेत आहे. दोघेही मोबाइल वेडे होते. मार्केटमध्ये कोणता ही मोबाइल येवो. या दोघांकडे त्याची इंत्यभूत माहिती असायची. मात्र पदरात असलेले अठरा विश्व दारीद्र्यामुळे त्यांंना मोबाइल खरेदी करता येत नव्हतं. त्यामुळे टीव्हीवरील आणि पेपरातील जाहिराती बघूनच हे दोघे आपले चित्र रंगवायचे. याचदरम्यान पेपरात आलेल्या एका ऑनलाईन फसवणुकीवर या दोघांची नजर पडली. याच पद्धतीने आपणही झटपट श्रीमंत होऊ शकतो. या कल्पनेने दोघांनी ऑनलाईन फसवणुकीचा मार्ग निवडला.


चोरीचा प्रकार उघड

ऑनलाईन फसवणुकीतील सर्व बारकावे शिकून या दोघांनी मलबार हिल येथील एका नागरिकास फोन करून बँकेतून बोलत असल्याचं सांगून क्रेडिटकार्ड व डेबिटकार्डची माहिती मिळवली. समोरील व्यक्तीने माहिती देताच दोघांनी त्याच्या खात्यातून तब्बल 99 हजार काढले. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर संबधित व्यक्तीने दोघांविरोधात मलबार हिल पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

तर दुसरीकडे एका झटक्यात हातात पडलेल्या ऐवढ्या मोठ्या रक्कमेमुळे त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. चोरीचे पैसे त्यांनी 'पेटीएम' व 'मायपैसा' खात्यावर फिरवले. त्याच खात्यातून दोघांनी ऑनलाईन 69 हजार रुपयांच्या महागड्या मोबाइलची ऑनलाईन खरेदी केली. चोरीला गेलेल्या पैशांचा माग काढत पोलिस दोन्ही आरोपींच्या पेटीएम आणि माय पैसाच्या खात्यापर्यंत पोहचले. दोघांचा गुन्ह्यात सहभाग निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी दाॆघांना यूपीतून अटक केली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा