मनसैनिकांचा पुन्हा राडा, मालाड, दादरमध्ये फेरीवाल्यांच्या सामानाची मोडतोड


मनसैनिकांचा पुन्हा राडा, मालाड, दादरमध्ये फेरीवाल्यांच्या सामानाची मोडतोड
SHARES

मालाडमधील मनसे विभाग अध्यक्षाला फेरीवाल्यांकडून मारहाण होताच मनसे कार्यकर्त्यांनी सायंकाळी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांचे बॅनर फाडत फेरीवाल्यांच्या स्टाॅलची मोडतोड केली. पाठोपाठ दादर पश्चिमेकडील प्लाझा सिनेमागृहाशेजारी देखील मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांचे सामान रस्त्यावर फेकले. या प्रकाराने मालाड आणि दादर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं.

मालाडचे मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांना मारहाण झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच. मनसे कार्यकर्त्यांनी मालाडच्या दिशेने धाव घेतली. काही वेळांतच तिथे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि मनसे नेते नितीन सरदेसाई देखील त्वरीत मालाडमध्ये पोहोचले. त्यांच्या नेतृत्वाखाली संतापलेल्या
मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत फेरीवाल्यांच्या सामानाची तोडफोड केली. त्यानंतर मालाड पोलिसांनी संदीप देशपांडे यांना ताब्यात घेत काही वेळाने सोडून दिलं.


दादरमध्ये मनसैनिकांनी फेरीवाल्यांना पळवलं

मालाडमधील घटनेचे तीव्र पडसाद मुंबईभर उमटायला सुरुवात झाली. या घटनेनंतर संतप्त मनसैनिकांनी दादरमधील फेरीवाल्यांचे धंदे उधळून लावत त्यांना पळवून लावलं. दादरमधील न. चि. केळकर मार्गावरील वीर कोतवाल उद्यानासमोरील पदपथ अडवून बसवणाऱ्या सर्व फेरीवाल्यांना मनसेचे पदाधिकारी संतोष साळी, अभय मालप, नेरुरकर यांच्यासह कार्यकर्ते यांनी पळवून लावले.

मात्र, फेरीवाल्यांना हटवताना कोणत्याही प्रकारची मारझोड त्यांनी केली नाही. यानंतर या मनसैनिकांनी दादर रेल्वे स्थानकाच्या दिशेने चाल करत छबिलदास गल्ली, रानडे मार्ग येथील फेरीवाल्यांनाही दम भरला. त्यामुळे मनसैनिकांकडून चोप मिळणार या भीतीने मग डिसिल्व्हा रोड, सेनापती रोड, जावळे मार्ग येथील फेरीवाल्यांनी स्वत:हून पळ काढला.


फेरीवाले राजरोसपणे बसतात, पण कारवाई होत नाही.

मनसेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करा असं चिथावणीखोर भाषण संजय निरुपम यांनी केलं. चिथावणीखोर भाषण करणाऱ्या संजय निरुपम यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. प्रशासन काम करत नाही, जर त्यांनी काम केलं, तर आम्हाला काहीच करायची गरज भासणार नाही. राज ठाकरे उद्या सकाळी मालाडमध्ये येणार आहेत.

- नितीन सरदेसाई, मनसे नेते



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा