पैशाच्या वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घाटकोपर येथे घडली आहे. इरफान शेख (25) असे मृत तरुणाचे नाव असून तो घाटकोपर येथील नित्यानंद नगरमध्ये राहत होता. त्याच्याच शेजारी राहणारा आरोपी सचिन शिवनकर (28) याच्यासोबत गेल्या अनेक दिवसांपासून इरफान याचा वाद सुरू होता.
घाटकोपर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इरफानने त्याच्याकडून काही पैसे घेतले होते. मात्र ते परत न मिळाल्याने या दोघांमध्ये अनेकदा वाद झाले होते. रविवारी रात्री दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. यावेळी आरोपीने रस्त्याच्या कडेला पडलेल्या बिअरच्या बटलीने इरफानवर हल्ला केला. तसेच त्याच्या गळ्यावर देखील वार केले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. घाटकोपर पोलिसांनी याप्रकरणी सचिन विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.