कुख्यात गुंडाला या पोलिस अधिकाऱ्याने दिलं अभय

पायधुनी पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात खंडणी आणि आर्म अॅक्ट प्रकरणात त्यांना अटक न करता प्रकरण मिटवल्याचा आरोप करण्यात आला आहे

कुख्यात गुंडाला या पोलिस अधिकाऱ्याने दिलं अभय
SHARES

कुख्यात गुंड एजाज लकडावालाचा साथीदार तारिक प्रवीण आणि सलीम महाराज या दोघांना एका गुन्ह्यात अभय दिल्याचा आरोप वाहतूक पोलीस दलात अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांच्यावर करण्यात आला आहे. या आरोपामुळे प्रवीण पडवळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पडवळ यांनी पायधुनी पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात खंडणी आणि आर्म अॅक्ट प्रकरणात त्यांना अटक न करता प्रकरण मिटवल्याचा आरोप करण्यात आला आहे.


कुख्यात गुंड एजाज लकडावलाच्या अटकेनंतर चौकशीत त्याला  तारिक प्रवीण आणि सलीम महाराज हे दोघे सहकार्य करत असल्याचे निष्पन्न झाले होते. कालांतराने पोलिसांनी या दोघांनाही अटक केली. या दोघांच्या चौकशीत त्यांच्यावर पायधुनी पोलिस ठाण्यात खंडणी आणि आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यावेळी तत्कालिन अतिरिक्त सह पोलिस आयुक्त प्रवीण पडवळ यांच्या सांगण्यानुसार या दोघांना अटक करता त्यांनी प्रकरण मिटवल्याचा आरोप आता त्यांच्यावर होत आहे. या प्रकरणी खंडणी विरोधी पथकांच्या पोलिसांनी प्रवीण पडवळ यांचा समन्स बजावला असल्याचे समजते. या समन्सनंतर प्रवीण पडवळ यांना याचं उत्तर गुन्हे शाखेच्या पोलिसांना द्यावं लागणार आहे.

या समन्सप्रकरणी आज प्रवीण पडवळ हे मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त संतोष रस्तोगी यांच्यासमोर हजर राहणार असल्याचे कळते. प्रवीण पडवळ सध्या मुंबई वाहतूक पोलीस दलात अप्पर पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. क्राईम ब्रांचच्या म्हणण्यानुसार प्रवीण पडवळ यांनी दिलेल्या उत्तरानुसार पोलीस दल आणि अंडरवर्ल्डशी संबंधित धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा