व्हाॅट्स अॅपवर मिळाली स्वतःच्याच मृत्यूची बातमी

मेसेज पाहून अनेकांनी रविंद्र आणि त्यांच्या कुटुंबियांना फोन करण्यास सुरूवात केली. रविंद्र यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला जवळपास ४०० श्रद्धांजलीचे मेसेज आले.

व्हाॅट्स अॅपवर मिळाली स्वतःच्याच मृत्यूची बातमी
SHARES

व्हाॅट्स अॅप हे एका सेकंदात शेकडो नागरिकांपर्यंत पोहचण्याचं एक उत्तम माध्यम आहे. मात्र,  व्हाॅट्स अॅपवर जाणूनबुजून फेक न्यूज पसरवण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशाच एका फेक न्यूजचा सामना दहिसरमधील रविंद्र दुसांगे यांना करावा लागला आहे. चक्क दुसांगे यांच्या मृत्यूचा मेसेज सर्वत्र पसरवण्यात आला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना नातेवाईकांकडून आणि मित्रपरिवाराकडून श्रद्धांजलीचे फोन आणि मेसेज येण्यास सुरुवात झाली.  ३ ते ४ दिवस दुसांगे हे आपण जिवंत असल्याचे सर्वांना सांगत होते. अशा पद्धतीने चक्क मृत्यूचा खोटा मेसेज मेसेज पसरवणाऱ्याविरोधात दुसंगे यांनी दहिसर पोलिसात तक्रार नोंदवली आहे.

४०० श्रद्धांजलीचे मेसेज

 रविंद्र दुसांगे हे एका खासगी कंपनीत कामाला आहेत. काही दिवसांपूर्वी दुसांगे यांच्या मोबाइलवर त्यांचंच निधन झालं असल्याचा मेसेज आला. हे पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. काही वेळातच तो मेसेज त्यांच्या फोटोसह ते असलेल्या सर्व ग्रुपवर व्हायरल झाला. मेसेज पाहून अनेकांनी रविंद्र आणि त्यांच्या कुटुंबियांना फोन करण्यास सुरूवात केली.  कुटुंबियांनाही याबाबत कोणतीही माहीती नसल्यामुळे त्यांनी रविंद्र यांच्याशी फोनवर बोलणे केल्यानंतर त्यांच्या जीवात जीव आला. मात्र तोपर्यंत रविंद्र यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला जवळपास ४००  श्रद्धांजलीचे मेसेज आले. त्यामुळे रविंद्र यांना चिंता होती की, जर हे मेसेज त्यांच्या आजारी असलेल्या आईला मिळाला तर तिचे काय होईल. या भीतीने हा खोटा मेसेज थांबवण्यासाठी रविंद्र यांनी दहिसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

एकावर संशय

मृत्यूचा खोटा मेसेज व्हायरल करण्यामागे दुसांगे यांनी एकावर संशय व्यक्त केला आहे. त्यांनी संशयित व्यक्तीचे नाव पोलिसांना सांगितलं आहे. आयटी अॅक्टच्या कलम ६६ (अ) नुसार याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.हेही वाचा  -

Exclusive : अशी आहे डाॅ. पायल तडवीची सुसाइड नोट, वाचा...

बनावट व्हिजा बनवल्याने गुजरातच्या इंजिनिअरला अटक
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा