छोटा शकीलचे तीन हस्तक अटकेत


छोटा शकीलचे तीन हस्तक अटकेत
SHARES

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा उजवा हात म्हणून ओळखला जाणारा छोटा शकीलच्या तीन हस्तकांना मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. ओबेल अदील, चाँद शेख, नुरानी खान अशी या तिघांची नावे आहेत. खुद्द छोटा शकीलने शिवाजीपार्क येथील व्यापाऱ्याला खंडणीसाठी धमकावल्याचं तपासात पुढं आल्याने काही दिवसांपूर्वी छोटा शकिलच्या मृत्यूच्या वावड्यांना पूर्णविराम मिळाला आहे.


काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी छोटा शकीलच्या सांगण्यावरून दादरच्या शिवाजी पार्क परिसरात राहणाऱ्या व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवून या तिघांनी त्याच्याकडे ५ लाखांची खंडणी मागितली होती. भीतीपोटी या व्यावसायिकाने खंडणी देखील दिली. मात्र छोटा शकिलकडून वारंवार होणाऱ्या पैशांच्या मागणीला घाबरून त्या व्यावसायिकाने शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.


तक्रारीची नोंद

या तक्रारीत व्यावसायिकाच्या पत्नीने स्वतः छोटा शकीलने फोन करून धमकावल्याचा दावा केला आहे. या गुन्ह्यांचा तपास मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडे सोपवण्यात आल्या नंतर खंडणीविरोधी पथकाने तिन्ही आरोपींना अटक केली. या तिघांच्या चौकशीत वांद्र्यात राहणाऱ्या बिलाल शमसीचं नाव पुढं आलं. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला बिलालच शकीलला खंडणीसाठी दूरध्वनी पोहोचवत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.


कोण आहे बिलाल?

७० च्या दशकात बिलाल शमसीचे वडिल बड्या तस्करांपैकी एक होते. त्यावेळी दाऊद, शकील, राजन आणि इतर गुंड शहरात नावारुपाला येत होती. या सर्वांनी बिलालच्या वडिलांच्या हाताखाली काम केलं होतं. त्यामुळेच गुंड पार्श्वभूमी असलेला बिलाल शमसी सध्या शकीलसाठी काम करायचा. खंडणीसाठी व्यावसायिकाची इत्थंभूत माहिती गोळा करून पुरवणे, व्यावसायिकाच्या हालचालींवर लक्ष ठेवून शकीलपर्यंत माहिती पोहोचवणे, अशा कामांचा त्यात समावेश आहे. सध्या पोलिस त्याचा शोध घेत आहेत.



हेही वाचा-

तिच्यानंतर 'त्याने'ही केली आत्महत्या, बीडीडी चाळीतील दुर्दैवी घटना


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा