सायनमध्ये २ कोटींचं हेराॅईन जप्त


सायनमध्ये २ कोटींचं हेराॅईन जप्त
SHARES

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी शाखेने आंतरराष्ट्रीय स्तरावरील ड्रज तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. मंगळवारी रात्री सायन परिसरात हेराॅईनची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

गौतम सिंग ओमकार सिंह (५५) आणि बंटी अली कुदरत अली (२३) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी २ कोटी रुपये किंमतीचं २ किलो वजनाचं हेराॅईन जप्त केलं आहे.


कशी केली अटक?

अंमली पदार्थविरोधी शाखेच्या वरळी युनिटला ड्रग्ज तस्करी करणारी टोळी सायनमध्ये येणार असल्याची गुप्त माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार युनिटचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सायनमधील चिदंबरम रोड याठिकाणी सापळा रचला. रात्री उशीरा पोलिसांना गौतम सिंग आणि बंटी अली असे दोघेजण संशयास्पदरीत्या वावरताना आढळले. त्यानुसार पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं.


आंतरराष्ट्रीय तस्करी टोळी

दोघांची झडती घेतल्यावर पोलिसांना २ किलो वजनाचं हेराॅईन सापडलं. प्रत्येकी १ किलो ४० ग्रॅम हेराॅईन पोलिसांनी जप्त केलं. या हेराॅईनची बाजारातील किंमत अंदाजे २ कोटी रुपये एवढी आहे. गौतमसिंग आणि बंटी अली हे दोघेही राजस्थानच्या झालवाडचे राहणारे आहेत. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी रॅकेटशी जोडलेले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून या प्रकरणाचे पुढचे धागेदोरे शोधण्याचं काम सध्या अंमली पदार्थविरोधी शाखा करत आहे. दोघांना न्यायालयापुढे सादर केल्यावर त्यांना ९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


हेही वाचा -

'लोन वूल्फ'वर मुंबई पोलिसांची करडी नजर!

ऐकावं ते नवलचं! चोरीचा माल लपवला विहिरीत

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा