सीसीटिव्ही कक्षाचे काम सुरळीत, मुंबई पोलिसांकडून खुलासा

पर्यायी व्यवस्था उपलब्ध असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपा कुठलाही परिणाम कामावर दिसून आला नसल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ठ केलं.

SHARE

वेतनवाढ आणि इतर खासगी बाबींमुळे संपावर गेलेल्या सीसीटिव्ही आपरेटरमुळे मुंबईच्या सुरक्षेला कुठलाही धोका नसल्याचा खुलासा मुंबई पोलिसांकडून करण्यात आला आहे. मागील दोन दिवसांपासून मुंबई पोलिसांच्या सीसीटिव्ही कक्षात काम करणार्या कर्मचारी संपावर गेल्यामुळे एकच वादंग निर्माण झाले होते.


मुंबईत नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून  ६००० सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचे जाळे टप्या टप्याने उभे करण्यात आले. हे सीसीटिव्ही यंत्रणा उभारणीचे काम गृहखात्याने ‘एलअण्ड टी’ या खासगी कंपनीला देण्यात आले होते. तर या सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या देखभालीचे, आँपरेटींग आणि तांत्रिक अडचणी सोडवण्याचे काम ‘सीएमएस’ या खासगी कंपनीला देण्यात आले होते. मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या पाचव्या माळ्यावरून या सीसीटिव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने मुंबईच्या कानाकोपऱ्यावर लक्ष ठेवले जाते. मागील सहा महिन्यांपासून या कक्षात काम करणाऱ्या तरुणांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. या कर्मचाऱ्यांनी अनेकदा त्यांच्याशी चर्चा करण्यासंदर्भात पत्र व्यवहार केला. मात्र अद्याप त्याची दखल घेण्यात न आल्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप पुकारला.

मात्र पर्यायी व्यवस्था उपलब्ध असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपा कुठलाही परिणाम कामावर दिसून आला नसल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ठ केलं. या कर्मचाऱ्यांचा मुंबई पोलिसांशी कुठलाही थेट संबध नसून कंत्राट दिलेल्या खासगी कंपनीचे ते कर्मचारी आहेत.  त्याच बरोबर सीसीटिव्हीद्वारे तपास करणारी सक्षम यंत्रणा मुंबई पोलिसांकडे सदैव कार्यरत असते. त्यामुळे खासगी कंपनीच्या अंतर्गत प्रकरणाचा मुंबईच्या सुरक्षेवर कुठलाही परिणाम होत नसल्याचे मुंबई पोलिस दलाचे प्रवक्ते, पोलिस उपायुक्त प्रणय अशोक यांनी सांगितले.

मागील अनेक वर्षापासून आमची कंपनी पोलिसांच्या सहकार्याने काम करत आहे. कंपनीतील काही कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या संपामुळे सीसीटिव्ही यंत्रणेच्या कार्यात कुठलाही अडथळा निर्माण झालेला नाही.  त्याचबरोबर  मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेला ही कुठली बाधा पोहचलेली नसल्याचे सीएमएस कंपनीच्या कायदेशीर सल्लागारांनी सांगितले. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या