प्रसिद्ध अभिनेता सलमान खान राहात असलेल्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल मुंबईल पोलिसांना आपल्यावर एकच खळबळ उडाली. या ई-मेलनंतर वांद्रे पोलिसांनी सलमानचं घर रिकामं करत ताबडतोब घराची झाडाझडती घेतली. परंतु त्यात काहीच आढळून न आल्याने सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘सलमानचं घर पुढील २ तासांत बॉम्बने उडवणार, थांबवू शकत असाल तर थांबवा,’ अशा धमकीचा ई- मेल मुंबई पोलिसांना ४ डिसेंबर रोजी आला. हा मेल मिळताच पोलिसांनी बॉम्बशोधक पथकासह ‘गॅलेक्सी’ अपार्टमेंटकडे धाव घेतली. त्यावेळी सलमान ‘दबंग ३’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याने घरी नव्हता. परंतु, सलमानचे आई-वडिल आणि बहिण घरात होते. पोलिसांनी त्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवत घराचीच नाही, तर संपूर्ण इमारतीची ३ ते ४ तास तपासणी केली. परंतु पोलिसांना कुठंही बॉम्ब आढळला नाही. त्यावरून ही धमकी खोटी असल्याचं पुढं आलं.
त्यानंतर पोलिसांनी आयपी अॅड्रेसच्या माध्यमातून हा ई-मेल कुठून आला त्याचा तपास केला. त्यानुसार हा ई-मेल गाझियाबाद इथल्या एका १६ वर्षीय मुलाने पाठवल्याचं पोलिसांना समजलं. पोलिसांनी गाझियाबादला जाऊन मुलाला ताब्यात घेतलं. संबंधित मुलाला पोलिसांनी न्यायालयात हजर करून त्याच्याविरोधात चार्जशीट दाखल केलं आहे.