गणेश विसर्जनासाठी ४० हजारांचं पोलीस बळ तैनात


गणेश विसर्जनासाठी ४० हजारांचं पोलीस बळ तैनात
SHARES

गणपती बाप्पाचं विसर्जन म्हणजे एक सोहळाच असतो, आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी अवघी मुंबापुरी रस्त्यांवर लोटते... ढोल ताशाच्या गजरात, गुलाल उधळत पुष्पवृष्टी करत भव्य मिरवणुका काढल्या जातात. गणेशभक्तांसाठी ही एक नेत्रसुखद पर्वणी असली, तरी पोलिसांसाठी मात्र ते एक मोठं आव्हान असतं. हा संपूर्ण सोहळा निर्वीघ्नपणे पार पाडण्याची सगळी धुरा मुंबई पोलिसांच्या खांद्यावर आहे. योग्य वाहतूक नियमनाने लाखोंच्या जनसमुदायाला मार्गस्थ करण्याबरोबर भक्तांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी चोख उपाययोजना केल्या आहेत. त्याचा घेतलेला हा आढावा.

दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली असून सगळ्या पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईत एकूण ११९ ठिकाणी विसर्जन स्थळे असून. मंगळवारी दिवसभरात अंदाजे २३ हजार घरगुती आणि ४ हजारहून अधिक सार्वजनिक गणपतींचं विसर्जन त्यात केलं जाईल. त्यासाठी ४० हजार मुंबई पोलिसांचं बळ २४ तास कार्यरत असणार आहे.


'एसआरपीएफ'च्या १२ तुकड्या

रॅपिड ॲक्शन फोर्सच्या १२ तुकड्या चौपाट्यांच्या मार्गावर तैनात करण्यात आल्या आहेत. यासह ८ हजार स्वयंसेवकांसह एनएसएस, एनसीसी, स्काऊट, गाईड आणि एनजीओची मदत देखील घेतली जाणार आहे.

गर्दीमध्ये महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी विशेष पथक तयार करण्यात आलं असून ते गर्दीच्या ठिकाणी साध्या वेषात तैनात असतील.


५ हजार कॅमेऱ्यांनी नजर

विसर्जन सोहळ्यादरम्यान लाखोंच्या संख्येने मुंबईकर विसर्जस्थळी येतात. प्रत्येकावर नजर ठेवणं निव्वळ अशक्य असल्यानं मुंबईभर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या जाळ्याचा उपयोग केला जाणार आहे. त्यानुसार ५ हजार कॅमेऱ्यांची नजर विसर्जन सोहळ्यावर असेल.


गणेश विसर्जनासाठी मुंबईत एकूण १३४ वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत. गरज भासल्यास ड्रोनच्या मदतीने पाहणी केली जाईल.
- रश्मी करंदीकर, डीसीपी, मुंबई पोलीस प्रवक्त्या


या क्रमांकावर संपर्क साधा

विसर्जन सोहळ्यादरम्यान कुठलीही अडचण आल्यास मुंबई पोलिसांच्या १०० क्रमांकावर संपर्क साधा किंवा ७७३८१४४१४४, ७७३८१३३१३३ या दोन क्रमांकावर 'एसएमएस' करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)  

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा