पीएमसी बँकेच्या खातेदारकांना दिलासा, रिझर्व्ह बँक एचडीआएलची मालमत्ता विकून पैसे परत करणार

टप्या टप्याने मुल्यांकन केलेल्या मालमत्तांचा लिलाव करून तातडीने खातेदारकांना पैसे परत करण्याची विनंती मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (EOW) ने केली आहे.

पीएमसी बँकेच्या खातेदारकांना दिलासा, रिझर्व्ह बँक एचडीआएलची मालमत्ता विकून पैसे परत करणार
SHARES
पीएमसी बँकेचा घोटाळा हा सध्या मुंबईकरांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. या घोटाळ्यानंतर चौघांना आपल्या जिवाला मुकावे लागले आहे. याची दखल घेत आता भारतीय रिझर्व्ह बॅंकेने नियुक्त केलेल्या तज्ज्ञांनी "हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेड"कडील (एचडीआयएल) मालमत्तांचे मूल्यांकन सुरू केले आहे. या प्रक्रियेनंतर पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंकेकडे तारण असलेल्या या मालमत्तांचा लिलाव करून खातेदारांचे पैसे परत करण्यात येणार आहे. 


पीएमसी बँक घोटाळा उघडकीस आल्यानंतर खातेदारांनी रस्त्यावर उतरून प्रशासन, पोलिस आणि रिझर्व्ह बँकेकडे दाद मागितली. ऐवढ्यावरच न थांबता खातेदारांनी  न्यायालयात या प्रकरणी आवाज उठवला. खातेदारांच्या या प्रयत्नांना आता यश प्राप्त झाले आहे. रिझर्व्ह बॅंकेने नियुक्त केलेल्या तज्ज्ञांनी पीएमसी बॅंकेकडील 'एचडीआयएल'च्या तारण मालमत्तांचे मूल्यांकन दोन दिवसांपूर्वी सुरू केले. टप्या टप्याने मुल्यांकन केलेल्या मालमत्तांचा लिलाव करून तातडीने खातेदारकांना पैसे परत करण्याची विनंती मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (EOW) ने केली आहे. त्यामुळे लिलावासाठी सर्व मालमत्तांचे मूल्यांकन होईपर्यंत वाट पाहिली जाणार नाही. आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत चार हजार कोटींच्या मालमत्तांवर टाच आणली होती. या मालमत्तेचा लिलाव करण्यास परवानगी मिळावी. यासाठी प्रशासनाने आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे "ना हरकत प्रमाणपञ" ही देण्याची विनंती केली आहे.

या मालमत्तांच्या लिलावाला परवानगी देण्याबाबतचा अर्ज एक-दोन दिवसांत न्यायालयात केला जाईल. न्यायालयाने मंजुरी दिल्यावर या मालमत्तांचा लिलाव करणे शक्‍य होणार आहे. यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने फौजदारी प्रक्रिया संहितेतील (सीआरपीसी) कलमांखाली एचडीआयएलचे मालक राकेश व सारंग वाधवा यांच्या स्थावर व इतर मालमत्तांच्या लिलावासंदर्भात अर्ज केला होता. त्यापैकी एक नौका, दोन विमाने आणि 14 वाहने या मालमत्ता पीएमसी बॅंकेकडे तारण नव्हत्या. परंतु, वाधवा यांनी या मालमत्ता विकण्याची परवानगी आधीच दिली होती. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखा लवकरात लवकर या मालमत्तांचा लिलाव करून पीएमसी बॅंकेच्या खातेदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. 

या घोटाळ्यात बँकेच्या संचालकांचा पोलिस शोध घेत आहे. त्या दोघांना अटक करण्यासाठी पोलिस त्यांच्या घरी ही गेले होते. माञ दोघांनी त्याच्या मूळ गावी म्हणजेच पंजाब येथे पळ काढला आहे.या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा