पीएमसीच्या माजी अध्यक्षाला अटक, गैरव्यवहार प्रकरणी ईडीचे छापे

पीएमसीने या कंपनीवर अक्षरक्ष कर्जाची खैरात केल्याचं समोर आलं. कर्जांची परतफेड होत नसतानाही ती खाती आरबीआयपासून लपवत बनावट अभिलेख तयार करून ती माहिती रिझर्व्ह बँकेला सादर केली.

SHARE

पंजाब अॅण्ड महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी सायंकाळी बँकेच्या माजी अध्यक्षाला माहिमहून अटक केली. वारियामसिंग कर्तारसिंग असे या आरोपीचे नाव आहे.

पंजाब  अँड  महाराष्ट्र सहकारी बँकेने (पीएमसी) बांधकाम क्षेत्रातील हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) या कंपनीला २००८ ते २०१९ या कालावधीत नियमबाह्यपणे कर्ज दिल्याचं उघडकीस आलं आहे. पीएमसीने या कंपनीवर अक्षरक्ष कर्जाची खैरात केल्याचं समोर आलं. कर्जांची परतफेड होत नसतानाही ती खाती आरबीआयपासून लपवत बनावट अभिलेख तयार करून ती माहिती रिझर्व्ह बँकेला सादर केली. दिवाळखोरीत गेलेल्या एचडीआयएलला पीएमसीने तब्बल ६५०० कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. त्यामुळे बँकेला ४३५५.४६ कोटी रुपयांचे नुकसान झालं. याची माहिती बँकेचे माजी व्यवस्थापक संचालक जॉय थॉमस यांनी एचडीआयएलला एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज दिल्याची कबुली रिझर्व्ह बँकेसमोर दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी या  पूर्वीच एचडीआयएलचे चेअरमन राकेश बधावन आणि त्यांचे पुत्र सारंग बधावन यांच्यासह माजी व्यवस्थापक संचालक जॉय थॉमस यांंना अटक केली होती.

या प्रकरणात पीएमसी बँकेचे माजी अध्यक्ष वारियामसिंग कर्तारसिंग यांचा ही सहभाग निदर्शनास आल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला माहिमहून अटक केली. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. तर दुसरीकडे 'ईडी'ने या गैरव्यवहार प्रकरणी आरोपींच्या घरी छापे मारून कारवाईला सुरुवात केली आहे. बँकेतील कर्जघोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने ईडी शुक्रवारी मुंबई व परिसरातील सहा ठिकाणी छापे टाकले. या कारवाईदरम्यान ईडीने एचडीआयएलचे चेअरमन राकेश बधावन आणि त्यांचे पुत्र सारंग बधावन यांचे खासगी जेट आणि ६० कोटी रुपये किंमतीचे दागिने जप्त केले. याबरोबरच नौकानयन व्यावसायात असलेली बधावन यांची एक नौकाही जप्त करण्यात येत असून त्यासाठी मालवदीवमधील अधिकाऱ्यांशी ई़डी संपर्कात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या