बनावट जन्म दाखला बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश


बनावट जन्म दाखला बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
SHARES

बनावट जन्मदाखला बनवणाऱ्या टोळीचा डी. एन. नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ही टोळी पालिकेच्या 'के पश्चिम' वार्डातून बनावट जन्म दाखला बनवत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महेंद्र सिंग महावीर चौहान उर्फ श्याम (३९), भरतकुमार खोलिया (४७), अनिल शंकर लबाडे (४७)सह पालिकेच्या सुनिल शंकर भोसले या अधिकाऱ्यालाही अटक केली आहे.


'याची' माहिती पोलिसांच्या हाती

बोरिवलीच्या आर मध्य वार्डातील आरोग्य विभागात सुनिल शंकर भोसले हा अधिकारी जन्म-मृत्यूच्या नोंदणीचं काम करायचा. भोसलेच्या मदतीने आरोपी हे गरजूंना मोबदल्यापेक्षा जास्त पैसे आकारून हवा तसा जन्म आणि मृत्यूचा दाखला उपलब्ध करून द्यायचे. याबाबतची माहिती डीएन नगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली.


तिघांना रंगेहाथ अटक

या बनावट जन्म दाखला बनवण्यासाठी तीन एजंट असल्याचं तपासात पुढे आलं. त्यानुसार पोलिसांनी एक बोगस गिऱ्हाईकाद्वारे यातील मुख्य आरोपी महेंद्र यांच्याशी संपर्क साधला. दरम्यान त्या बोगस गिऱ्हाईकाची जन्म तारीख २४ मे १९८५ अशी असताना या टोळीने संगनमताने त्याच्या जन्मतारखेचा दाखला १० नोव्हेंबर १९७८ असा बनवून देताना पोलिसांनी त्यांना रंगेहाथ अटक केली.


'यांचा'ही सहभाग निश्चित 

पुढे चौकशीत यामागे पालिकेच्या बोरिवली वार्डातील आरोग्य विभागात कार्यरत असलेले पालिकेच्या सुनिल शंकर भोसले यांचाही सहभाग निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. याप्रकरणात अन्य काही जणांचा समावेश असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून पोलिस त्या अनुषंगाने तपास करत आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा