दिलीप कुमारांचं घर बळकावू पाहणाऱ्या बिल्डरच्या कोठडीत वाढ


दिलीप कुमारांचं घर बळकावू पाहणाऱ्या बिल्डरच्या कोठडीत वाढ
SHARES

ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांचं वांद्र्यातल्या पाली हिलमधील घर बळकावण्याच्या प्रयत्नात असलेल्या बिल्डर समीर भोजवानीच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे. बनावट कागदपत्र बनवत भोजवानी दिलीप कुमार यांचं वांद्रे येथील घर बळकावण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप दिलीपकुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी केला होता. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मदतीची याचना केली आहे. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात लक्ष घालत भोजवानी विरोधात गुन्हा नोंदवला होता.


संपूर्ण प्रकार

दिलीप कुमार यांनी १९५३ मध्ये हसन लतीफकडून पाली हिल येथील घराची जागा १ लाख ४० हजारांना खरेदी केली होती. पारिजात डेव्हलपर्ससोबत २००८ मध्ये या जागेचा पुनर्विकास करण्याचा करार झाला होता. मात्र, काही कारणामुळे हे प्रकरण न्यायालयात गेलं. त्यानंतर ३० ऑगस्ट २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने संबंधित जागा दिलीप कुमार यांना परत करण्याचे आदेश डेव्हलपर्सला दिले होते. यानंतर सायरा बानो यांनी १२ सप्टेंबर २०१७ रोजी संबंधित जागेवर ताबा घेतला. 

आता वांद्रे येथील पाली हिल स्थित या घराच्या जमिनीचं खोटं कागदपत्रं बनवून समीर भोजवानी नावाच्या बिल्डरने त्यांची जागा बळकवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अनेकदा धमकीही दिली होती. याबाबत सायरा बानू यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. 

त्यावेळी बनावट कागदपत्रांच्या आधारे दिलीप कुमार यांची 300 कोटींची मालमत्ता बळकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या समीर भोजवानीला पोलिसांनी 26 एप्रिल 2018 रोजी अटक केली.

त्यावेळी न्यायालयाने त्याला 3 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिसांनी गुरूवारी भोजवानीला न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने त्याला आणखी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा