शिफू सनकृती प्रकरणी पोलीस 'त्या' मॉडेलच्या शोधात


शिफू सनकृती प्रकरणी पोलीस 'त्या' मॉडेलच्या शोधात
SHARES

शिफू सनकृतीचे सर्वेसर्वा सुनील कुलकर्णीबाबत रोज नवनवीन गूढ उघडकीस येण्याची मालिका सुरूच आहे. आतापर्यंत केलेल्या पोलिसांच्या तपासात या सुनील कुलकर्णीने एका मॉडेलला देखील फसवल्याचे समोर आले आहे. कुलकर्णीने या मॉडेलला चित्रपटात काम देण्याचे आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात तसे काहीच झाले नसल्याची बाब समोर आली आहे. तसेच पुढे या मॉडेलचे काय झाले याचाच सध्या पोलीस तपास करत आहेत. न्यायालयाच्या दणक्यानंतर पोलिसांनी सुनील कुलकर्णीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक देखील केली. पण त्यांच्यावरील आरोप सिद्ध करणे पोलिसांनाच जिकरीचे होऊन बसले आहे. ज्या मुलींमुळे हा सगळा वाद सुरू आहे, त्या मुलींनीच सुनील कुलकर्णीच्या बाजूने जबाब नोंदवल्याने पोलिसांची चांगलीच गैरसोय झाली आहे. कुलकर्णीसोबत असलेल्या इतर दोन मुलांनी देखील कुटुंबियांमुळे घर सोडल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

मालाड येथील पालकांनी या सुनील कुलकर्णीने आपल्या दोघा मुलींचे ब्रेनवॉश करून त्यांना घर सोडण्यास भाग पडल्याचा आरोप केला होता. या कुलकर्णीने शिफू सनकृतीच्या नावाखाली दोघींना वेश्या व्यवसाय आणि ड्रग रॅकेटमध्ये जुंपल्याचे देखील पालकांनी आपल्या आरोपात म्हटले होते. सुरुवातीला पालकांनी मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पण पोलिसांनी दुर्लक्ष केल्यावर त्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालय गाठले. मात्र हा सगळा प्रकार न्यायालयासमोर आल्यानंतर न्यायालयाने देखील आश्चर्य व्यक्त करत या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. हे कुलकर्णी महाशय स्वतः डॉक्टर तसेच मानसोपचारतज्ज्ञ असल्याचा दावा करतात. पण प्रत्यक्षात असे काहीच नसून त्यांचे सर्टिफिकेट्स देखील बोगस असल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर समोर आले आहे.

काय आहे शिफू सनकृती
सुनील कुलकर्णीने शिफू सनकृती या नावाने सुरू केलेल्या फेसबुक पेजवर अनेक दावे केले आहेत. आत्मा आणि परमात्म्याचे मिलन अशा अवस्थेत घेऊन जाऊ शकतो जिथे बुद्धी आणि मन हे एकाच पद्धतीने काम करतील असे एक ना अनेक दावे या पेजवर करण्यात आले आहेत. या पेजवरील बराचसा मजकूर हा सेक्स या विषयावर आहे. सेक्सपेक्टेशन, कोलेजच्या मुलामुलींमधील शारिरीक संबंध, डेटिंग, प्रेम या सगळ्याबद्दल या पेजवर लिखाण करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपासह फसवणुकीचे अनेक गुन्हे कुलकर्णीवर नोंद आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा