कॅन्सर पीडितांना मदत करण्याच्या बहाण्याने महिलेला लाखोंचा गंडा!

कॅन्सरग्रस्तांना मदतीसाठी परदेशातून अनेकजण पैसे पाठवतात. मात्र, पुरेशी खातरजमा न केल्यास काही बोगस मदतकर्त्यांकडून तुम्ही लुटले जाण्याची शक्यता आहे! भायखळ्याच्या जे. जे. मार्ग परिसरात अशा बोगस मदतकर्त्यांनी एका महिलेला चक्क ४ लाख ५० हजार रूपयांचा गंडा घातल्याचं समोर आलं आहे.

कॅन्सर पीडितांना मदत करण्याच्या बहाण्याने महिलेला लाखोंचा गंडा!
SHARES

कुणी गंभीर आजाराने ग्रस्त असेल, कुणाला शारिरीक अपंगत्व असेल किंवा कुणाला कॅन्सर झाला असेल, तर अशा रूग्णांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था पुढे येतात. तसेच, अनेकदा अशा रुग्णांना मदत करण्यासाठी सामान्यांनाही आवाहन केलं जातं. त्यावर लोकं उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सढळ हातांनी मदतही करतात. मात्र, पुरेशी खातरजमा न केल्यास अशा बोगस मदतकर्त्यांकडून तुम्ही लुटले जाण्याची शक्यता आहे! भायखळ्याच्या जे. जे. मार्ग परिसरात अशा बोगस मदतकर्त्यांनी एका महिलेला चक्क ४ लाख ५० हजार रूपयांचा गंडा घातल्याचं समोर आलं आहे.


लुटण्यासाठी फेसबुकची मदत!

जे. जे. मार्ग परिसरात रहाणाऱ्या सुमय्या फय्याज मोमीन या ३८ वर्षीय महिलेशी दोन अज्ञता तरूणांनी फेसबुकवरून मैत्री केली. आपण न्यूयॉर्कला रहात असल्याची बतावणी केली. त्यावर, भारतातल्या कॅन्सरग्रस्तांना मदत करायची इच्छाही दर्शवली.


मदत मिळवण्यासाठी टॅक्स!

ठरल्यानुसार ही मदत स्विकारण्यासाठी सुमय्या तयार झाल्यानंतर या दोघांनी आर्थिक मदतीचं पार्सल भारतात पाठवल्याचं सांगितलं. पण हे पार्सल विमानतळावर कस्टमने पकडलं असून ते सोडवण्यासाठी ४ लाख ५० हजार रूपये भरावे लागणार असल्याचं या दोघांनी सुमय्या मोमीन यांना सांगितलं.


विमानतळावर पार्सल पोहोचलेच नाही!

मोठी मदत मिळणार या आमिषाला बळी पडून अखेर सुमय्या यांनी हे पैसे या दोघांनी दिलेल्या खात्यात भरले. मात्र, पैसे मिळताच या दोघांनी त्यांचे मोबाईल बंद केले. घाबरलेल्या अवस्थेत सुमय्यांनी दिल्ली विमानतळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र, अशा प्रकारचे कोणतेही पार्सल आपल्याकडे आलेले नसल्याचं त्यांनी सांगितलं.

या सगळ्या प्रकारामुळे धक्का बसलेल्या सुमय्या यांनी जे. जे. मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी या दोघा भामट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

मदतीच्या आवाहनाचे आणि त्याला मिळणाऱ्या प्रतिसादाचे सर्वच प्रयत्न बोगस किंवा फसवणारे नसतात. मात्र, अशा आवाहनांना प्रतिसाद देताना आपण पुरेशी खातरजमा करून घेणं आवश्यक आहे. नाहीतर, तुम्हीही असेच फसवले जाल!



हेही वाचा

ब्लूटूथ नाही दिले म्हणून चाकूने गळ्यावर वार! वडाळ्यातली घटना


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा