रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

रेल्वेच्या आरक्षित ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा रेल्वे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
SHARES
रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासासाठी स्थानकातील तिकीट खिडक्यांसमोरील मोठ्या रांगेत उभं राहून तिकीट काढावं लागतं. मोठी गर्दी असल्यामुळं प्रवाशांना यामध्ये अधिक वेळ खर्च करावा लागत असून, त्यामुळं निश्चित स्थळी त्यांना योग्य वेळेत पोहोचता येत नाही. त्यामुळं रेल्वे प्रशासनानं प्रवाशांची या त्रासातुन सुटका करण्यासाठी ई-तिकीटची सुविधा उपलब्ध करून दिली. या सेवेचा अनेक प्रवाशांनी लाभही घेतला. मात्र, महत्वाचं म्हणजे रेल्वेच्या आरक्षित ई-तिकिटांचा काळाबाजार होत असल्याचं समोर आलं आहे. याबाबत माहिती मिळताचं रेल्वेच्या आरक्षित ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा रेल्वे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तसंच, टोळीच्या मुख्य सूत्रधारालाही अटक केली.

या प्रकरणी पोलिसांनी अमीन काग्झी याला सुरतमधून अटक केली. अमीन हा २०१६पासून ‘एएनएमएस’ आणि ‘मॅक’ सॉफ्टवेअरच्या माध्यमातून एकावेळी हजारो ई-तिकिटांचं बुकिंग करणाऱ्या सॉफ्टवेअरची विक्री करत होता. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांची शेकडो तिकिटे काही मिनिटांतच बुक केली जात होती. परिणामी सर्वसामान्य प्रवाशांना तिकिटे उपलब्ध होत नव्हती. दुसरीकडे दलालांमार्फत हीच तिकिटे जादा पैसे घेऊन काळ्याबाजारानं विकली जात असल्याची माहिती मिळते.

रेल्वेच्या आरक्षित ई-तिकिटांचा काळाबाजार करणारी ही टोळी मुंबई, नवी मुंबईसह सुरतमार्गे दुबईपर्यंत पसरल्याची माहिती समोर येत आहे. या आरक्षित ई-तिकिटांच्या काळाबाजारातून मिळणारे कोट्यावधी रुपये दहशतवादी कारवायांसाठी उपलब्ध केले जात असल्याचा दावाही रेल्वे पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीतून २०१२ पासून ही टोळी कार्यरत असल्याचं समोर आलं आहे.

रेल्वे पोलिसांनी तिकीटांच्या काळाबाजाराबाबत माहिती मिळताच देशभर कारवाई करण्यास सुरूवात केली होती. त्यानुसार, या कारवाईत ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांकडून पुढील तारखेची तब्बल २७,९४८ तिकिटं जप्त केली आहेत. तसंच, ही तिकिटं रद्द करण्यात आली असून त्यांची किंमत तब्बल ७ कोटी ९६ लाख २३ हजार ६२८ रुपये एवढी आहे.

तत्काळ बुकिंग सुरू झाल्यावर काही मिनिटांतच तिकिटांची विक्री होत असल्यानं काळाबाजार सुरू असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर आरपीएफनं तिकीट खिडक्यांवर काळाबाजार करणाऱ्या दलालांविरोधात वर्षभरापूर्वी मोहीम हाती घेतली. परंतु, त्यानंतर देखील एवढ्या मोठ्या संख्येनं तिकिटं लगेचच बुक होत असल्यानं त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात होता. 

या तंत्रज्ञानाचा शोध घेत असताना पोलिसांनी याप्रकरणी बंगळूरुमधून गुलाम मुस्तफा याला अटक केली आणि या ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या देशव्यापी टोळीचा पर्दाफाश करण्यात आरपीएफला यश आलं. चौकशीदरम्यान तिकिटांच्या काळ्या-बाजारातून निर्माण होणाऱ्या पैशांतून दुबईसह विविध ठिकाणी मालमत्ता घेतल्याची माहिती मिळाली. अटक केलेल्या एका आरोपीवर दहशतवादाचे गुन्हे असल्यानं याचा त्यादृष्टीनंही सुरक्षा यंत्रणांकडून समांतर तपास सुरू आहे. 

या टोळीचा म्होरक्या अमीन काग्झी आणि सिस्टीम अ‍ॅडमिन व मॅकचा मॅनेजर अमित प्रजापती हे मूळचे सुरतचे असले, तरी या टोळीची पाळेमुळे मुंबईत रुजल्याचे चौकशीत समोर आहे. या दोघांच्या अटकेपूर्वी २८ जानेवारीला अ‍ॅडमिन सत्यवान उपाध्याय ऊर्फ बाबा यास तळोजामधून अटक करण्यात आली. त्याच्याकडून सर्व माहिती व यंत्रणा समजून घेतल्यानंतर आरपीएफनं १४ फेब्रुवारीला गोवंडीतून अ‍ॅडमिन नूर उल हसन ऊर्फ आयानला अटक केली. त्यानंतर १७ फेब्रुवारीला दोन्ही मुख्य सूत्रधारांना सुरतमधून आणि २४ फेब्रुवारीला तिसरा मुख्य अ‍ॅडमिन अतिक रिझवी याला कुर्ल्यातून अटक केली आहे.


हेही वाचा -

मराठी भाषा गौरव दिन : राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये साजरा

मराठी भाषा दिन : एसटी महामंडळाचा अनोखा उपक्रम



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा