Advertisement

मराठी भाषा दिन : एसटी महामंडळाचा अनोखा उपक्रम

मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून एसटी महामंडळातर्फे प्रत्येक बसस्थानकांवर विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.

मराठी भाषा दिन : एसटी महामंडळाचा अनोखा उपक्रम
SHARES

राज्यातील सर्व विद्यापीठे, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून एसटी महामंडळातर्फे प्रत्येक बसस्थानकांवर विशेष उपक्रम राबविणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी केली आहे. 

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त संपूर्ण बसस्थानक आणि बसस्थानक परिसर स्वच्छ, सुशोभित करून आकर्षकरित्या रांगोळी काढण्यात आली आहे. तसेच बसस्थानकांमध्ये कवी सुरेश भट यांनी लिहलेले आणि संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेले 'लाभले आम्हास भाग्य...' हे मराठी अभिमान गीत प्रवाशांना दिवसभर ऐकविण्यात येत आहे.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्व बसस्थाकावर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आगार व विभाग कार्यक्षेत्रातील ज्येष्ठ मराठी पत्रकार यांचे वतीने कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच सर्व प्रवासी व कर्मचारी बांधवांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. बसस्थानकाच्या ध्वनिक्षेपकावरून दिवसभर सातत्याने राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रवासी व कर्मचारी बांधवांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा प्रसारित करत आहेत.

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपले योगदान दिले पाहिजे, केवळ शासन स्तरावर 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा न होता, तो जनसामान्यांपर्यंत पोहचवावा, यासाठी महाराष्ट्राची 'लोकवाहिनी' असलेली एसटी खऱ्या अर्थाने योग्य माध्यम आहे. त्यामुळे गेली ४ वर्षे एसटी महामंडळातर्फे विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमांतून 'मराठी भाषा गौरव दिन' मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यंदाचे ५वे वर्ष असल्याचे अनिल परब यांनी सांगितलं.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा