सावधान! इंटरनेटवर 'रीपर' व्हायरस वेगाने पसरतोय!

'रीपर' असं या 'बॉटनेट'चं नाव असून आत्तापर्यंत जगभरातील इंटरनेटशी जोडल्या गेलेल्या तब्बल २० लाखांहून अधिक उपकरणांना त्याने आपल्या विळख्यात घेतल्याचं समजतंय. आणि त्याहून गंभीर म्हणजे दररोज १० हजार उपकरणांना हा बॉटनेट लक्ष्य करत आहे. त्यामुळे त्याचा हा वेग समस्त नेटकरांच्या काळजीत भर घालणारा आहे.

सावधान! इंटरनेटवर 'रीपर' व्हायरस वेगाने पसरतोय!
SHARES

'सध्या इंटरनेटचा जमाना आहे' हे वाक्य आपण नेहमीच ऐकतो. पण इंटरनेटसोबतच हा व्हायरसचाही जमाना आहे! इंटरनेटच्या साहाय्याने तुम्ही सोशल मीडियावर टाकत असलेली तुमची माहिती कधीही या व्हायरसच्या भक्ष्यस्थानी पडू शकते! आणि, सगळ्यात धक्कादायक म्हणजे त्याचा तुम्हाला थांगपत्ताही लागत नाही. सध्या इंटरनेट विश्वात अशाच एका व्हायरसने खळबळ माजवली आहे. 'रीपर'!


'रीपर'चा अविश्वसनीय वेग!

'रीपर' असं या 'बॉटनेट'चं नाव असून आत्तापर्यंत जगभरातील इंटरनेटशी जोडल्या गेलेल्या तब्बल २० लाखांहून अधिक उपकरणांना त्याने आपल्या विळख्यात घेतल्याचं समजतंय. त्याहून गंभीर म्हणजे, दररोज १० हजार उपकरणांना हा बॉटनेट लक्ष्य करत आहे. त्यामुळे, त्याचा हा वेग समस्त नेटकरांच्या काळजीत भर घालणारा आहे.



कसा असतो 'रीपर' अटॅक?

सामान्यपणे आपल्या आसपास असलेल्या यांत्रिक उपकरणांपैकी 70 टक्के उपकरणं ही इंटरनेटशी जोडलेली असतात. काही ठिकाणी हे प्रमाण 100 टक्केही असतं. इंटरनेटला जोडलेल्या अशा उपकरणांना 'रीपर' लक्ष्य करतो. सुरक्षेचे उपाय नसलेले राऊटर्स आणि वायरलेस आयपी कॅमेरे मुख्यत: त्याच्या टार्गेटवर आहेत. 'रीपर'चा वापर करणारे हॅकर्स यासाठी खास बनवण्यात आलेल्या प्रोग्राम्सचा वापर करून आपली उपकरणं हॅक करत आहेत.

हा मालवेअर जगभरात अतिशय वेगाने पसरत असून भारतातही तो पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच महाराष्ट्र सायबर सेलने या मालवेअर पासून बचावाच्या काही नियमावली काढल्या आहेत.

बालसिंग राजपूत, पोलिस अधीक्षक, महाराष्ट्र सायबर सेल


काय आहे बॉटनेट?

इंटरनेटवरील व्हायरसने ग्रासलेल्या लाखो-करोडो कम्प्युटर्सचं मिळून 'बॉटनेट' तयार होतं. यात कम्प्युटर्स, वायफाय राऊटर्स आणि नेटशी जोडलेल्या इतर उपकरणांचा समावेश होतो. या उपकरणांचा, त्यांच्या काम्प्युटिंग पॉवरचा वापर हा या द्वारे मोठ्या सायबर अटॅकसाठी केला जातो. सगळ्यात धक्कादायक म्हणजे, हे सगळं होत असताना ते उपकरण वापरणाऱ्याला, म्हणजेच आपल्याला, त्याचा थांग पत्ता देखील लागत नाही!


'मीराई'पेक्षाही भयंकर व्हायरस!

गेल्या वर्षी 'मीराई' नावाच्या बॉटनेटने हल्ला चढवत जगभरातील अनेक वेबसाईट्सना लक्ष्य केलं होतं. त्यावेळी न्यूयॉर्क टाइम्स, ट्विटर, नेटफ्लिक्ससारख्या नामांकित संकेतस्थळांचा कित्येक तासांसाठी संपर्क तुटला होता. मात्र, 'रीपर' हा 'मीराई'पेक्षा कित्येक पटींनी घातक असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.



ही तर वादळापूर्वीची शांतता...

दिवसागणिक या बॉटनेटचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. अद्याप या बॉटनेटने मोठा सायबर हल्ला चढवलेला नसला, तरी या बॉटनेटचं तंत्रज्ञान, त्याची व्याप्ती आणि त्याची गती बघता ही वादळा पूर्वीची शांतता आहे, असंच म्हणावं लागेल.

विजय मुखी, सायबर एक्स्पर्ट


कोण अडकलंय 'रिपर'च्या कचाट्यात?

'रीपर बॉटनेट'ने आत्तापर्यंत अनेक मोठ्या नेटवर्किंग सिस्टिम्सला टार्गेट केलं आहे. याची यादीच महाराष्ट्र सायबर सेलने दिली आहे. यामध्ये राऊटर्स आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा समावेश आहे.

राऊटर्स(Routers) - डी लिंक (D-link), टीपी लिंक (TP-link), नेटगिअर (Netgear), लिंकसिस (Linksys), मायक्रोटिक (MikroTik) इ.

आयपी आधारित सीसीटीव्ही कॅमेरे - व्हॅक्रॉन (Vacron), अॅव्हटेक (AVTECH), गोवाहेड (Goahead), जॉज (JAWS) इ.


'रीपर'पासून कसं कराल संरक्षण?

  1. इंटरनेटशी जोडलेली सगळी उपकरणं अपडेट ठेवा
  2. स्ट्राँग फायरवॉल, अँटी-व्हायरसने तुमचं नेटवर्क सुरक्षित करा
  3. वैयक्तिक उपकरणांसाठी डिफॉल्ट पासवर्ड न वापरता कठीण पासवर्डची निवड करा
  4. कॉर्पोरेट संस्थेत प्रत्येक कर्मचाऱ्याने कठीण पासवर्ड ठेवणे सक्तीचे करा
  5. सुरक्षित समजले जाणारे व्हीपीएन आणि एसएसएच प्रोटोकॉल वापरा
  6. नेटवर्कमध्ये एन्क्रिप्शनला विशेष प्राधान्य द्या
  7. वापरात नसलेल्या सेवांना बंद करून नेटवर्क एक्स्पोजर कमी करण्याचा प्रयत्न करा
  8. तुमच्या उपकरणात संशयास्पद हालचाल झाल्यास फॅक्टरी रीसेट केल्यास मालवेअरपासून सुटका मिळू शकते



हेही वाचा

हॉटेलात बिलासाठी एटीएम कार्ड द्याल तर खबरदार! तुमचाही असाच घात होईल!


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा