फिल्मी स्टाईलने लुटली बँक


SHARE

'धूम' आणि 'बँक चोर' या सिनेमात बँकेची लूट होत असल्याची दृश्यं आपण सर्वांनाच आठवत असेल. पण रिअल लाईफमध्येही चोरट्यांनी अगदी याच पद्धतीने बँकेची लूट केली आहे. बँक ऑफ बडोदाच्या जुइनगर शाखेत ही चोरी झाली असून सोमवारी ही घटना उघडकीस आली.


चोरट्यांनी 27 लॉकर तोडले

या चोरट्यांनी बँक ऑफ बडोदाच्या जुईनगर शाखेत शिरून 27 लॉकर तोडले आणि त्यातील सर्व मौल्यवान दागिने घेऊन पळाले. पण ही चोरी शनिवारी झाली की रविवारी हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. कारण या दोन्ही दिवशी बँक बंद होते. पण सोमवारी बँक उघडल्यानंतर एक ग्राहक आपले दागिने घेण्यासाठी जेव्हा बँकेत आला, तेव्हा ही बाब उघडकीस आली.


सोमवारी बँक ऑफ बडोदाच्या जुईनगर शाखेच्या लॉकरमध्ये ठेवलेले आपले दागिने घेण्यासाठी एक खातेदार तिथे आला. त्यानंतर तो खातेदार आणि बँक अधिकारी लॉकरच्या रुमजवळ गेले तेव्हा तेथील 27 लॉकर तुटलेले होते. याचसोबत त्यातील दागिनेही गायब होते. हे पाहताच बँक अधिकाऱ्याला चांगलाच धक्का बसला. त्याने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या चोरट्यांनी बाजूच्या दुकानातून एक सुरुंग लावत त्यातून बँकेत प्रवेश करत दागिन्यांसह काही रोख रकमेचीही चोरी केली. पोलीस सध्या या चोरट्यांचा शोध घेत आहेत.

संबंधित विषय